कोर्टी जिल्हा परिषद गटात समीकरण बदललं! जगताप, राजेभोसले यांच्यामुळे बळ वाढणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषदेच्या कोर्टी गट व पंचायत समितीच्या केत्तूर गणातील उमेदवारांच्या प्रचार पत्रकावर माजी आमदार जयवंतराव जगताप व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले यांचे फोटो झळकले आहेत. त्यामुळे या परिसरात चर्चेचा विषय झाला असून या गट व गणातील उमेदवारांचे पारडे आणखी जड झाले असल्याची चर्चा आहे.

करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या १२ गणात ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील सुरु आहे. माजी आमदार जगताप व राजेभोसले यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांना विजयी करण्यासाठी काम केले होते. सवितादेवी राजेभोसले या मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळखल्या जातात. मात्र सध्या होत असलेल्या निवडणुकीत मोहिते पाटील व माजी आमदार जगताप यांना वगळून आमदार पाटील यांचे उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत.

आमदार पाटील यांच्या पॅनलविरुद्ध माजी आमदार जगताप व मोहिते पाटील यांनी भूमिका घेतल्या आहेत. सवितादेवी राजेभोसले यांनी कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांनी हा मेळावा रद्द केला होता. या मेळाव्याला जगताप हे देखील उपस्थित राहणार होते.

करमाळ्यात माजी आमदार संजयमामा शिंदे व बागल हे एकत्रितपणे राष्ट्रवादी (घड्याळ) व भाजपच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले आहेत. कोर्टी जिल्हा परिषद गटात बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. केत्तूर गणात ऍड. अजित विघ्ने हे निवडणूक रिंगणात आहेत तर कोर्टी गणात नाना झाकणे हे रिंगणात आहेत. या गटातील उमेदवारांच्या डिजिटल बॅनरवर जगताप व राजेभोसले यांचे फोटो झळकले आहेत.

कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटात आमदार पाटील यांच्याकडून ऍड. नितीन राजेभोसले यांच्या पत्नी योगिनी राजेभोसले यांना उमेदवारी आहे. ऍड. राजेभोसले यांनी ऐनवेळी माजी आमदार शिंदे यांची साथ सोडून पाटील गटात प्रवेश केला होता. तर पाटील यांनी मेळाव्यात राजेभोसले यांची मोहिते पाटील यांच्याकडून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र शेवटच्याक्षणी चित्र पलटले.

माजी आमदार जगताप व राजेभोसले यांच्यामुळे या गटात राष्ट्रवादी व भाजपचे बळ वाढणार असल्याचे बोलले जात आहे. गुळवे यांचे या भागात मोठे काम आहे. याचा विचार करूनच शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांच्या विरोधक समजल्या जाणाऱ्या राजेभोसले यांचाही त्यांनाच पाठींबा मिळत असल्याने आणखी फायदा होणार आहे, अशी चर्चा या भागात आहे. मात्र राजेभोसले या त्यांची अधिकृत भूमिका कधी स्पष्ट करतील हे पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *