जगताप गट जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत खासदार, आमदार यांच्याबरोबरच उतरणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जगताप गट मोहिते पाटील व आमदार नारायण पाटील यांच्याबरोबरच उतरणार आहे. जागा वाटपाबाबत लवकरच चर्चा होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली जाईल, असे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेचा (शिंदे गट) माजी आमदार जगताप यांनी पहिलाच मेळावा घेतला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत त्यांनी भूमिका मांडली. या मेळाव्याला अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार जगताप म्हणाले, ‘आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा होत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत जगताप गट आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर होता. तर लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्याबरोबर होता. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार नारायण पाटील यांच्याशी चर्चा करून योग्य जागा घेतल्या जातील. जगताप गटाने योग्य उमेदवार सुचवावेत त्यानुसार उमेदवाऱ्या दिल्या जातील. जागा वाटप निश्चित झाल्यानंतर पुढे आणखी मेळावा घेतला जाईल’, असे माजी आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *