करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून बागल गटाचे युवा नेते दिग्वीजय बागल यांच्यासह आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक सुनिल सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप, डॉ. हरीदास केवारे, विद्यमान सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांच्यासह ८४ जणांनी माघार घेतली आहे. पृथ्वीराज पाटील यांचा अर्ज राहिलेला असून उद्या ते मागे घेतील, असे सांगितले जात आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता बाजार समिती बिनविरोध होणार की निवडणुक लागणार हे स्पष्ट होणार आहे.
करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत बागल, जगताप, पाटील गटात मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समझोता झाला. आमदार शिंदे यांनी जगताप गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. करमाळा बाजार समितु निवडणुकीसाठी १६१ अर्ज दाखल झाले होते. त्यातील १५४ अर्ज पात्र झाले होते. त्यातील ८४ जणांनी आतापर्यंत माघार घेतली आहे. तर ७० जणांचे अर्ज राहिले आहेत. 18 जागांसाठी ही निवडणुक लागली होती. त्यात सावंत गटाची हमाल तोलार एक व जगताप गटाच्या व्यापारी गटातील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात पाटील व बागल गटाला प्रत्येकी दोन- दोन जागा तर जगताप गटाला ११ जागा मिळाल्या आहेत.