करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मांगी येथे वनविभागाच्या पथकाने पहाणी केली असून ठस्यांच्या निरीक्षण करून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काल (शुक्रवारी) सायंकाळी प्रीतम माळी यांना मांगी हद्दीतील आंनद बागल यांच्या गट नंबर १६ मध्ये बिबट्या दिसला होता. त्यानंतर आज (शनिवारी) येथे मोहोळ येथून वनविभागाचे पथक आले होते. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके यांनी नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र याबाबत वरिष्ठांना अहवाल दिला जाईल, खबरदारी म्हणून येथे कॅमेरा बसवला जाणार असून नियंत्रणासाठी काही कर्मचारी ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दोन दिवसांपूर्वी जातेगावमध्ये शेळीवर हल्ला; बिबट्यासदृश्य प्राणी मांगीतून पोथरेत ‘काय’ आहे वन विभागाचा निष्कर्ष वाचा सविस्तर फक्त ‘काय सांगता’वर
मांगी येथून पोथरेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या बागल यांच्या उसात काल बिबट्या गेला होता. तसे ठसे आजही दिसले आहेत. लटके व वनविभागाचे एस. आर. कुर्ले यांनी येथे पहाणी केली. तेव्हा पोथरे व मांगी येथील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. उसामध्ये असलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मांगी ग्रामपंचायत येथे सर्व नागरिकांना लटके यांनी मार्गदर्शन केले.
लटके म्हणाले, या भागात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. लहान मुले व शेळ्या यांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बिबट्या दिसलेल्या परिसरात आपण कॅमेरा बसवणार आहोत. तेव्हा नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर लटके यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, येथील बैठकीत झालेला अहवाल सादर केला जाईल, असे सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकार्ते सुजित बागल, युवा सेनेचे आदेश बागल, पोथरेचे सोपान शिंदे, पोलिस पाटील संदीप शिंदे यांच्यासह तलाठी काळे, माजी सरपंच राजेंद्र बागल, अभिमान अवचर, पोलिस पाटील आकाश शिंदे, गणेश ढवळे आदी उपस्थित होते.