करमाळा (सोलापूर) : पाटील गटाने माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाच वर्षाच्या काळातील गैरव्यहावरचा पेनड्राईव्ह हाती लागल्याचा आरोप केला होता. त्याला मनसेने चॅलेंज दिले असून ‘तो पेनड्राईव्ह करमाळ्यातील सुभाष चौकात लावावा त्याचा स्क्रीनसह सर्व खर्च करणार असल्याचे’, नाना मोरे यांनी जाहीर केले आहे.
‘झेडपी’, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पाटील गटाकडून शिंदे गटाला ‘पेन ड्राईव्ह’चा इशारा
माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाच वर्षातील गैरकारभाराची पोलखोल करणारा ‘पेनड्राईव्ह’ हातील लागला असून तो काढण्याचा इशारा आमदार नारायण पाटील यांच्या पाटील गटाचे सुनील तळेकर यांनी दिला होता. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पाटील व शिंदे समर्थकांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगल्याचे यानिमीत्ताने दिसत आहे.
पाटील गटाचा आरोप…
पाटील गटाचे तळेकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले होते की, ‘माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाच वर्षाच्या काळातील कारभाराची पोलखोल करणारा ‘पेन ड्राईव्ह’ हाती लागला आहे. याची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे व नंतरच याबाबत पुढील पाऊल उचलले जाणार. त्यांच्या कालावधीत खर्ची केलेल्या आमदार फंडातील तसेच इतर मंजुर कामांची उद्घाटने, भुमिपुजन करत आहेत. त्यांच्या कालावधीत त्यांनी मंजूर कामांची व इतर कामांची साधी प्रशासकीय मंजूरीसुध्दा वेळेवर मिळवली नाही. हे अपयश स्वतःहून जगाला दाखवत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्यानेच त्यांनी स्टंटबाजी सुरु केली आहे.’
मनसेचे चॅलेंज?
मनसेचे नाना मोरे यांनी म्हटले आहे की, माजी आमदार शिंदे यांनी त्यांच्या काळात अनेक विकास कामे केली आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उलपब्ध केला आहे. त्यांची अनेक कामे सुरु आहेत. तर अनेक कामे होणार आहेत. त्यांचे कार्यकर्ते त्यांना कामाच्या भूमिपूजनाला व लोकार्पणाला बोलवत आहेत. याचा त्रास पाटील गटाला होत आहे. त्यांनी निधी आणावा कामे करावीत. नारायण पाटील हे करमाळ्याचे आमदार आहेत. राजकीय चिखलफेक थांबवून त्यांनी विकास कामे करावीत. करमाळा प्रशासकीय भवनाचे काम ते का करत नाहीत? दहिगाव उपसासिंचन योजनेचे काम का बंद पाडले आहे? जातेगाव ते टेंभुर्णी मार्गाचे काम का सुरु होईना? आदिनाथ कारखाना कधी सुरु होणार आहे? याची माहिती नागरिकांना द्या? कुकडीचे पाणी करमाळ्याला मिळेल का? मांगी तलावाचे पाणी जामखेडला चालले आहे. त्याला तुम्ही विरोध करला का? शिंदे यांच्या कोणत्या गैरकारभाराचा तुमच्याकडे पेनड्राइव्ह आहे? तो सुभाष चौकात लावून आपण पडताळणी करू. त्याचा सर्व खर्च आम्ही करतो,’ असे मोरे यांनी म्हटले आहे.
पाटील गट चॅलेंज स्वीकारले का?
पाटील गटाने शिंदे यांच्यावर आरोप करून पेनड्राइव्ह काढण्याचा इशारा दिला आहे. त्याला मनसेचे मोरे यांनी चॅलेंज दिले असून हे चॅलेंज पाटील गट स्वीकारणार का? हे पहावे लागणार आहे.
