करमाळा (सोलापूर) : पुनवर येथील रुक्मिणी गजानन धनवडे यांनी मोलमजूरी करुन मुलगा राहुलला अधिकारी बनवले आहे. राहुलचा हा प्रवास अतिशय खडतर, हृदयस्पर्शी आहे. राहुल सात महिन्याचा असतानाच त्याचे पिताछत्र हरपले. राहुलला एक भाऊ व दोन बहिणीला संभाळण्याची जबाबदारी आईवर पडली. आईने अशा अवस्थेत न डगमगता येणाऱ्या संकटाला सामोरे जात मोलमजूरी करुन आपल्या मुलांचे संगोपन करून त्यांना शिक्षण दिले. हेच आईचे कष्ट, उमेद, अठरा विश्व- दारिद्र्य पाहून राहुलने मनाशी खूनगाठ बांधून आपले शिक्षण कमवा व शिका योजनेतून घेतले.
शिक्षण घेताना त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. एमपीएससी परिक्षेसाठी आईने मोलमजूरी व भावाने ड्रायव्हर काम करून वाटेल ते कष्ट करून खर्च पुरवला. राहुलने सात वर्षे एमपीएससीचा अभ्यास करत वेगवेगळ्या परीक्षेचे निकाल एक- दोन मार्कावरून जात असे तरी आपले मन खचून न जाता आई आणि भावाच्या प्रेरणेमुळे आपल्या अठरा विश्व दारिद्र्याकडे पाहून अभ्यासाची चिकाटी न सोडता शेवटी नगरपालिका संवर्ग राज्यसेवा अंतर्गत टीसीएस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात 39 व्या क्रमांकाने कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली.
राहुलच्या या कष्टातून मिळवलेल्या यशामुळे पुनवर ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. लक्ष्मण राख, प्रा. कुदळे, राहुलचे बंधू दादा धनवडे, सोमनाथ धनवडे, चुलते आजिनाथ धनवडे, माजी सरपंच आनंद भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्य बापू नरसाळे, माजी मार्केट कमिटी संचालक अरुण धुमाळ, शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ थोरवे, सरपंच केशव शेळके, उपसरपंच सुनील जाधव, माजी उपसरपंच अतुल थोरवे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ नरसाळे, बाळू नरसाळे, डॉ. येताळ, सुप्रसिद्ध युवा उद्योजक युवराज साबळे, भारत नरसाळे, बापूराव नरसाळे, माजी सरपंच रामभाऊ नरसाळे, माजी उपसरपंच अशोक नरसाळे, भारत ननवरे, दादा येताळ, दादा धनवडे, नितिन येताळ, लक्ष्मण निंबाळकर, पोपट जाधव, रवींद्र जाधव, गणेश जाधव, अविनाश शेलार तसेच गावातील लहान थोर मंडळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना राहुलने जिद्द, चिकाटी, डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठू शकतो हे व्यक्त केले. आपल्या यशाचे सर्व श्रेय आई व भावाला देऊन त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही असे उद्गार काढले. याप्रसंगी प्रा. लक्ष्मण राख, अविनाश शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोमनाथ थोरवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. दिलीप थोरवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोमनाथ धनवडे यांनी मानले.