अशोक मुरूमकर
‘तुमचे मतदान हे फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळणार नाही तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणार आहे. या मतदारसंघात आता शिंदे व सावंत परिवार एकत्र आला आहे. तुमच्या एकीचे बळ हे मला आता मतातून दाखवा, असे थेट आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
माढा तालुक्यातील वाकाव येथे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरु आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, रश्मी बागल, आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, चित्रा वाघ, खासदार निंबाळकर आदी उपस्थित आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, साखर कारखान्यांसाठी मोदींनी अभूतपूर्व निणर्य घेतले. त्यामुळे कारखाने व्यवस्थित सुरु आहेत. शरद पवार यांनी कारखान्यवरील आयकर कर रद्द केला नाही. मात्र मोदींनी २५ हजार कोटी आयकर रद्द केला. शेतकऱ्यांना मोदींनी करमुक्त केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेवर अनेक दिवस येथे राजकारण सुरु होते. मात्र मी मुख्यमंत्री असताना त्याचा अभ्यास केला आणि निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही फ्लड डायव्हर्शन करत पाणी देण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात वाया जाणारे सर्व पाणी या जिल्ह्यात देऊन दुष्काळमुक्त केले जाणार आहे. जिल्ह्यातील उपसासिंचन योजना आम्ही मार्गी लावल्या आहेत. त्यासाठी मोदींनी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे सिंचन योजना मार्गी लागत आहेत.
‘६० वर्षातील सरकार आणि १० वर्षातील सरकार यामध्ये खूप फरक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करत आहोत. ही निवडणूक देशाची आहे. सबका साथ, सबका विकास करण्याची हि निवडणूक आहे. मतदान हे फक्त निंबाळकर यांना मिळणार नाही तर ते मोदींना मिळणार आहे. येथे शिंदे व सावंत परिवार एकत्र आले आहेत. तुमच्या एकीचे बळ हे मला आता मतातून दाखवा, असे म्हणत त्यांनी थेट आवाहनचे केले आहे.