करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुंभेज या छोट्याशा खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा निवास कन्हेरे यांच्या चित्रांना परदेशात लाखोची किंमत आली आहे. कन्हेरे यांच्या चित्रांचे मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 23 ते 28 ऑगस्टपर्यंत प्रदर्शन होणार आहे. शेवटच्या दिवशी सोलो शो होणार आहे. तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कलाकाराला हा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन अभिनंदन केले जात आहे.
कुंभेज येथील कन्हेरे यांना लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद होता. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असताना शाळेतील अभ्यासापेक्षा चित्रकलेतच मन रमत असे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर अभिनव कला महाविद्यालयातून पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर काही काळ अध्यापक महाविद्यालय करमाळा येथे त्यांनी कला शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून ललित कला प्रकारामध्ये पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.
हाडाचा कलाकार असलेल्या कन्हेरे यांनी छंद जोपासण्यासाठी पूर्ण वेळ देऊन झोकून दिले. यानंतर त्यांच्याकडून अप्रतिम अशा कलाकृती तयार झाल्या. त्याचे देशविदेशातील कला रसिकासाठी या चित्राचे मोल अनमोल आहे. देशातील अनेक दिवाणखान्याची व महत्त्वाच्या ठिकाणची शोभा त्यांनी काढलेल्या कलाकृती वाढवत आहेत. त्यांच्या अमुर्तचित्र (ॲस्ट्रेक पेंटींग) या कलाप्रकारातील चित्रांना आपल्या देशाबरोबरच दुबई, ऑस्ट्रेलिया स्विझर्लंड, जर्मनी, पॅरीस, रोम व अमेरिकेत मागणी आहे. आजपर्यंत त्यांना या क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
देशातील नामांकित अशा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन व सोलो शो चे आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक कलाकाराचे या ठिकाणी आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन व्हावे, असे स्वप्न असते. याप्रमाणे माझेही असलेले हे स्वप्न पूर्ण होत आहे. याचे समाधान आहे. माझ्या कलेच्या या प्रवासात व प्रदर्शनासाठी सहकार्य केलेल्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे कन्हेरे यांनी सांगितले आहे.