करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळख असलेल्या करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी रस्ता केसमध्ये विक्रम केला आहे. दाखल केस निकाली काढून त्वरित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तालुक्यात रोज सरासरी चार ठिकाणी त्या स्थळ पहाणी करत आहेत. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
करमाळ्याच्या तहसीलदार म्हणून पदभार घेतल्यापासून ठोकडे यांची कारकीर्द गाजत आहे. बेकायदा वाळू उपसा आणि मुरूम उत्खनन यावर त्यांचे बारीक लक्ष असून त्यांनी सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल जमा केला आहे. कोणत्याही शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही यावर त्यांचा भर असून रस्ता केस देखील त्वरित निकाली काढल्या जात आहेत.
करमाळा तालुक्यात 650 शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी अर्ज आहेत. ते निकाली काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे कामावर परिणाम झाला होता. त्यानंतर पावसामुळे स्थळ पहाणीत अडचणी येत होत्या. त्यामुळे संख्याही वाढली होती. मात्र आता ही संख्या कमी केली जाणार आहे. त्यासाठी रोज सरासरी 4 ठिकाणी स्थळ पहाणी केली जात असून 150 केस निकाली काढल्या आहेत, असे तहसीलदार ठोकडे यांनी ‘काय संगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, रस्ता केस निकाली काढण्यावर भर दिला जात आहे. काही अर्जामध्ये त्रुटी आहेत, तर काही अर्ज नियमात नाहीत. स्थळ पहाणी करून शेतकऱ्यांना कायदेशीर रित्या रस्त्याचे आदेश दिले जात आहेत. याशिवाय कार्यालयीन शासकीय कामकाज देखील पहावे लागत आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये याकडे लक्ष आहे.
त्वरित निकाल मिळाल्याने समाधान!
शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून करमाळा तहसील कार्यालयात अर्ज केला होता. मात्र अर्ज दाखल केला आणि तत्कालीन तहसीलदार समीर माने यांची बदली झाली. त्यानंतर अनेक दिवस तहसीलदार नव्हते. त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नव्हता. त्यामुळे आमचे शेत पडीक पडले होते. शेतात जाता येत नसल्याने पेरणी करता आली नाही. परंतु तहसीलदार ठोकडे यांनी याची दाखल घेऊन रस्ता देण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामा, स्थळ पहाणी अशी कायदेशीर प्रक्रिया करून आम्हाला रस्त्यासाठी न्याय दिला आहे.
-किरण कांबळे, शेतकरी