करमाळा (अशोक मुरूमकर) : अवैध मद्यसाठा वाहतूकप्रकरणी करमाळा तालुक्यातील फिसऱ्याचा सरपंच हनुमंत रोकडेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी या पथकाने करमाळ्यातील त्याच्या जयहिंद हॉटेलमधून सिनेस्टाईलने त्याला ताब्यात घेतली असल्याची चर्चा असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाला आहे. यातून उरुळी कांचन येथे बेकायदा मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांचा सूत्रधार म्हणून फिसऱ्याचा सरपंच रोकडे याच्यावर पथकाचा संशय आहे. अटक केलेल्यांमध्ये विलास बाळासाहेब चव्हाण (रा. हडपसर पुणे), राजू दादासाहेब केकान (करमाळा) व रोकडे यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
सोलापूर- पुणे महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक शनिवारी (ता. १३) गस्त घालीत होते. तेव्हा गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयित वाहनांची तपासणी केली. तेव्हा त्यात बनावट विदेशी मद्य, गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य असा साठा सापडला. त्यात वाहनचालकाकडे चौकशी केल्यानंतर संबंधित मद्य केकन यांच्याकडून मिळाल्याचे समोर आले. यात मुख्य सूत्रधार रोकडे असल्याचा संशय आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. यामध्ये चारचाकी गाडीसह ४ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
