चिमुकलीची आर्त किंकाळी ऐकली असती तर… आजोबांनी दोघांना दिला एकत्रित अग्नी, केत्तूरमधील जुळ्या चिमुकल्यांचा हत्येचा थरकाप उडवणारा घटनाक्रम

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील केत्तूर नंबर २ येथील जुळ्या चिमुकल्याच्या हत्येचा थरकाप उडवणारा घटनाक्रम समोर आला आहे. याप्रकरणात हत्या केलेल्या बापाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावरही सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिस उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्याकडे हा तपास असून आज (रविवार) न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या (DFSL) अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची तपासणी केली आहे. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरु आहे.

घटना व कुटुंबाची पार्श्वभूमी
केत्तूर २ येथील सुहास ज्ञानदेव जाधव (वय ३२) या संशयिताने पोटाच्या ८ वर्षाच्या जुळ्या बहीण भावंडाची विहिरीत टाकून हत्या केली. मुलाचे नाव शिवांश तर मुलीचे नाव श्रेवा होते. २०१६ मध्ये त्याचा विवाह झाला होता. राजुरी त्याची सासुरवाडी आहे. तो झरे येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात नोकरी करत होता. त्याचे आर्थिक सदन म्हणून कुटुंब प्रचित होते. वडीलही शासकीय सेवेत होते. मुलांना विहिरीत टाकल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्यानेही विषप्राशन केले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो राहायला केत्तूर येथे होता. त्यांना हिंगणी येथे शेती आहे. तेथील विहिरीत मुलांना त्याने टाकले.

कशामुळे केले हे कृत्य
संशयित बाप सुहास हा नोकरीला होता. मिळालेल्या माहितीनुसार सुहास हा मानसिकदृष्ट्या खचलेला होता. त्याच्यावर बारामतीत एका रुग्णालयात उपचार सुरु होते. आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होऊ शकतो असे त्याला वाटत होते. आपला मृत्यू झाल्यानंतर मुलांचा सांभाळ कोण करेल अशी त्याला चिंता होती. गेल्या काही दिवसांपासून त्याला झोप येत नव्हती. त्याला गोळ्याही सुरु होत्या. मात्र तो असे कृत्य करेल याची थोढीही कल्पना घरातील व्यक्तींना आली नाही.

कसे केले हे कृत्य
शनिवारी सकाळी तो मुलांना मोटारसायकलवर शेतात घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर त्याने पहिल्यांदा मुलीला विहिरीत टाकले. ‘प्पपा मला विहिरीत टाकू नका’ अशी आर्त किंकाळी तिने फोडली. मात्र मानसिक संतुलन बिघडलेल्या निर्दयी बापाने त्याच्या लाडक्या चिमुकलीची ही किंकाळी ऐकली नाही. तेव्हा मुलगा देखील ओरडत पळून गेला. मात्र परिसरातही त्याचा हा आवाज ऐकायला कोणी नव्हते. अखेर त्याने तिला विहिरीत टाकलेच. त्यानंतर त्याने मुलालाही पकडले आणि विहिरीत टाकले. बहिणीला डोळ्यादेखत बापाने विहिरीत टाकले याची भीती चिमुकल्याच्या चेहऱ्यावर होती. मात्र तो स्वतः देखील यातून वाचू शकला नाही. निर्दयी बापा त्यालाही उचलले आणि विहिरीत टाकले. तो विहिरीच्या जाईवर पडला होता. मात्र त्यानंतर तोही पाण्यात पडला’ तेथेच दोघांचाही अंत झाला.

पुढे काय?
पोटच्या दोन्ही मुलांना विहिरीत टाकल्यानंतर निर्दयी सुहासने स्वतःही विष प्राशन केले. त्यानंतर मोटारसायकलने करमाळा मार्गे तो सोलापूरच्या दिशेने गेला. दीड वाजताच्या सुमारास मेव्हण्याला त्याने फोन करून मानसिक त्रासातून दोन्ही मुलांना विहिरीत टाकून विषप्राशन केले असल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन शोधकार्य सुरु केले. ही घटना संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. दरम्यान सुहासने प्रवासात दुसऱ्यांदाही विषप्राशन केले असल्याची माहिती मिळत आहे. त्याला बार्शी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे.

एकाचवेळी जन्मले आणि एकाचवेळी गेले
शिवांश व श्रेवा हे आठ वर्षांची जुळी बहीण भावंड होती. या घटनेमुळे करमाळा तालुका हादरला. त्यांच्यावर केत्तूर येथील स्मशानभूमीत त्यांचे आजोबा ज्ञानदेव जाधव यांनी दोघांना एकत्रित अग्नी दिला. एकाच चितेवर दोन्ही मृतदेह ठेवण्यात आले होते. यावेळी हिंगणी, केत्तूर व राजुरी येथील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *