करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या वतीने ‘अमली पदार्थमुक्त’ देशासाठी अमली पदार्थ जागरूकता, निरोगी जीवनशैली, युवक दिन व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर झाले. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा दिवाणी न्यायाधीश एस. एम. घुगे होते. IPS अधिकारी अंजना कृष्णा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थि होत्या. प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आजचा स्वतंत्र आणि प्रगत भारत घडण्याचे श्रेय राजमाता जिजाऊ साहेबांना जाते. त्यांनी बाल शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज रोवले आणि ते जोपासले. रयतेविषयी आपुलकी, महिलांचा सन्मान आणि न्यायप्रियता हे संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांवर केल्यामुळेच ते जगातील इतर राजांपेक्षा वेगळे ठरले.’
पुढे बोलताना डॉ. माने म्हणाले, ‘देशाची समृद्धी आणि प्रगती घडविण्याची खरी ताकद ही देशातील युवकांमध्येच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी दाखवलेले आदर्श, मूल्ये आणि मार्ग अंगीकारले पाहिजेत’. IPS अंजना कृष्णा म्हणाल्या, ‘तुम्ही आयुष्यात जे व्हायचे ठरवाल ते नक्कीच व्हाल. विद्यार्थ्यांनी नेहमी कठीण आव्हाने स्वीकारली पाहिजेत. यश मिळाले तर आनंद साजरा करा आणि अपयश आले तर त्याची कारणे शोधून त्यातून धडे घेत नव्या जोमाने प्रयत्न करा’.
एस. एम. घुगे यांनी स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य व विचार यावर मनोगत व्यक्त केले. ‘एका वेळी एक काम करा आणि तुमचा संपूर्ण आत्मा त्यात ओता. आयुष्यात जोखीम घ्या; जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तरी मार्गदर्शन कराल’. न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी, अॅड. दिवाण, अॅड. यादव देशमुख, अॅड. मंजरतकर, यशकल्याणीचे गणेश करे पाटील यांनी महिला हक्क, ग्राहक हक्क, अमली पदार्थविरोधी कायदे व विविध सामाजिक कायद्यांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले तर आभार डॉ. ए. टी. करपे यांनी मानले.
