करमाळा तालुक्यात ‘गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ मोहीम राबवली जाणार : जगताप

करमाळा (सोलापूर) : ‘करमाळा तालुक्यातील नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला असून येणाऱ्या काळात ‘गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ मोहीम राबवली जाणार आहे’, असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

करमाळ्यात तुळशी वृंदावन येथे सहा फुटी विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, शिवसेना शाखेचे उद्घाटन, धर्मवीर आनंद दिघे वाचनालयाचे उद्घाटन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सिद्धार्थ आधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन माजी आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहरप्रमुख संजय शीलवंत, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख संतोष वारगड, ओबीसी तालुकाप्रमुख अंकुशराव जाधव, आरपीआयच्या नीलावती कांबळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, तालुका उपप्रमुख गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, जे. जे. युवा मंचचे अध्यक्ष जयराज चिवटे, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई फंड, हनुमंत फंड, विश्वास काळे, अमोल परदेशी, प्रवीण कुटे, रघुनाथ क्षिरसागर, रघुनाथ कांबळे, ॲड. नवनाथ राखुंडे, मनोज पितळे यांच्यासह नगरपालिकेचे आकाश वाघमारे, शशांक भोसले आदी उपस्थित होते.

माजी आमदार जगताप म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांच्यामुळे करमाळा तालुक्यातील मंत्रालय स्तरावरील कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही. सोलापूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह आम्ही प्रयत्न करू. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ‘धनुष्यबाणा’वर लढवणार आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हाप्रमुख चिवटे म्हणाले, ‘माजी आमदार जगताप यांच्या प्रवेशामुळे करमाळा तालुक्यात शिवसेना मजबूत झाली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन अब्दुले यांनी केले तर आभार मुख्याधिकारी सचिन तापसे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *