करमाळा (अशोक मुरूमकर) : कुणबी दाखले काढण्यासाठी लागणारी कगदपत्रे काढण्यासाठी सध्या तहसील कार्यालयात गर्दी वाढली आहे. गर्दीच्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी असतानाही आहे त्या कर्मचाऱ्यांवर नागरीकांना सेवा दिली जात असून कर्मचाऱ्यांवर ताण असल्याचे दिसत आहे. मात्र गर्दी होत असली तरी नागरीकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. कारण कुणबी दाखल्यासाठी लागणारे अनेक दस्त अतिशय जीर्ण झाले आहेत, ते हताळणे कठीण असून दाखल्याचे वैधता होईपर्यंत त्याची गरज असते.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले. त्यानंतर सरकारने कुणबी नोंद सापडलेल्या बांधवांना दाखले देणे सुरू केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरण दाखल झाल्यानंतर व त्रुटी दूर झाल्याबरोबर तत्काळ दाखले देण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचे करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
राज्यात जरांगे यांनी आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सुरुवातीला रात्रंदिवस कुणबी नोंदी शोधण्याचे काम झाले. त्यानंतर सापडलेल्या नोंदी प्रत्येक गावात प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामुळे दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. अभिलेख कक्षात सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी होत आहे. ही गर्दी आहे तेच कर्मचारी सांभाळत आहेत. साधारण पाचपट गर्दी वाढली आहे. इतरवळी साधारण 20 ते 30 प्रकरणे रोज येत तेथे आता साधारण 150 प्रकरणे येत आहेत. गर्दी जास्त आणि कर्मचारी कमी असे चित्र आहे, अशावेळी नागरीकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे.
अभिलेख विभागात अतिशय जीर्ण झालेली अनेक कागदपत्रे आहेत. त्याला हात लागल्याबरोबर तुकडे पडतात, मात्र ते कागद महत्वाचे असतात. कुणबी दाखले काढताना अनेक कागद जुने असल्याचे दिसत असून ते कागद जतन करणे आवश्यक आहे. या कागदाला धक्का लागू नये म्हणून नागेश ननवरे व मयूर मुसळे हे अतिशय उत्कृष्टपणे नागरीकांना सेवा देत आहेत. नागरीकांनी त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.
सध्या लोकसभा निवडणूक प्रशिक्षण व निवडणुकीचे कामकाजही सुरू आहे. त्यामुळे अधिकारीही निवडणूक कामात गुंतत आहेत आणि दुसरीकडे कार्यालयीन इतर कामे देखील सुरू आहेत. अभिलेख विभागात गर्दी होत असून रोज साधारण 500 दस्त सह्यासाठी येतात. निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार दादासाहेब गायकवाड व महसुलचे नायब तहसीलदार काझी हे दाखले वेळेत देण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिश्रम घेत आहेत.
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, नागरीकांना दाखले काढण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक गावात नोंदी प्रसिद्ध केल्या आहेत. नागरीकांना तत्काळ सेवा देण्यावर भर दिला जात आहे.
याची आहे आवश्यकता…
करमाळा तहसील कार्यालयात नागरीकांना तत्काळ दाखले व त्यासाठी लागणारी कागदपत्रे देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अभिलेख कक्षात होणारी गर्दी लक्षात घेता येथे कक्षाच्या समोर नागरीकांना माहिती देण्यासाठी एकाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे अभिलेखमधील कर्मचाऱ्यांना विनाअढथळा काम करता येईल. व नागरिकांना आणखी योग्यरीत्या माहिती समजेल.