करमाळ्यात सत्ता बदलाशिवाय पर्याय नाही : कुणाल पाटील

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी नागरिकांना सत्ता बदलाशिवाय पर्याय नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

आगामी नगरपालिका निवडणुक ‘करमाळा शहर विकास पॅनल’च्या माध्यमातून पाटील यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. शहरातील सुविधांमध्ये सुधार घडवून आणण्यासाठी या पॅनलची घोषणा त्यांनी केली आहे. पाटील म्हणाले, ‘करमाळा शहरात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था, विस्कळीत दिवाबत्ती व्यवस्था आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगरपालिकेचा कारभार त्याच त्याच प्रतिनिधींकडे जात असल्यामुळे विकासावर परिणाम होत आहे. घरपट्टी, पाणीपट्टी यांसह विविध कर देणाऱ्या नागरिकांची यामुळे कुचंबना होत आहे. या व्यवस्थेत बदल करण्यासाठीच करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागातून युवा प्रतिनिधी पुढे करून नगरपालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी हा पॅनल निश्चितच प्रयत्नशील राहणार असल्याचे’ पाटील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शहरातील प्रस्थापित गट केवळ सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने एकत्र येण्यासाठी बैठका घेत असताना कुणाल पाटील यांनी मात्र एकला चलो रे ही भूमिका घेत शहरातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून या भेटी- गाठींच्या माध्यमातून त्यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठीचे युवा आणि सुयोग्य उमेदवार निवडले असल्याचेही पाटील यांनी शेवटी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *