करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी अजून सुरु आहे. मात्र या निकालात बागल गटाच्या सर्व जागा विजयी होतील यामध्ये आता काहीच शंका राहिलेली नाही. सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या फेरीपासून बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. हा निकाल बागल गटाच्या बाजूने आहे यावर फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. या निकालानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु झलेल्या आहेत.
मकाई सहकारी साखर कारखाना हा लोकनेते दिगंबररावजी बागल यांनी स्थापन केलेला आहे. सुरुवातीपासून बागल गटाची येथे एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच १७ जागांसाठी तब्बल ७५ अर्ज दाखल झाले होते. मात्र त्यातील बागल विरोधी गटाचे फक्त पाच अर्ज पात्र ठरले होते. सहकारी संस्था मतदारसंघात नवनाथ बागल यांचा एकच अर्ज आल्याने ते सुरुवातीलाच बिनविरोध झाले होते. या निकालात बागल गट विजयी होण्यासाठी जी कारणे आहेत त्यात प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे…
१) मकाई साखर कारखाना हा बागल गटाचे दैवत लोकनेते दिगंबरराव बागल मामा यांनी स्थापन केलेला आहे. हा कारखाना म्हणजे बागल गटाचा अस्मितेचा विषय आहे. कारखाना अडचणीत असला तरी या कारखान्यावर प्रेम करणारे सभासद आहेत. तेथे बागल गटाने जो उमेदवार दिलेला असेल त्याच्या मागे सर्व सभासद ठाम राहतात. त्यांच्यावर रोष असला तरी अपवाद सोडले तर बहुतांश सभासद हे गट सोडत नाहीत.
२) मकाई कारखान्यात जे सभासद आहेत ते बहुतांश सभासद हे बागल गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विश्वासातील व्यक्तीच या कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे निवडणूक लागल्यानंतर ते त्यांच्या मागे ठाम असतात. जे त्यांच्या विरोधात आहेत. त्याचा या निवडणुकीत फारसा परिणाम होत नाही. हे या निवडणुकीतून दिसले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा विरोधकांची मते घटतील असा अंदाज आहे.
३) मकाई सहकारी साखर कारखान्यात विरोधी गट रिंगणात उतरला असला तरी त्यांच्याकडे नियोजन नव्हते. निवडणुकीत संपूर्ण तयारी त्यांची नव्हती. त्याचा फायदा बागल गटाला झाला. १७ उमेदवारही विरोधी गटाला मिळाले नाहीत. कारखान्याच्या नियमात बसणारे उमेदवार विरोधी गटाला मिळाले नाहीत. त्यामुळे विरोधकांचा वेळ हा न्यायालयीन लढाईत जास्त गेला. त्यांना प्रचाराला वेळ मिळाला नाही. त्यामुळे निवडणुकीत चुरसही दिसून आला नाही.
४) मकाई साखर कारखाना अडचणीत असतानाही योग्य नियोजन करत कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. या निवडणुकीत बागल गटाचे प्रमुख रश्मी बागल किंवा दिग्विजय बागल हे कोणच रिंगणात नव्हते. मात्र कार्यकर्त्यांनी सभासदांना विश्वासात घेऊन प्रचार केला. नेत्यांनीही माध्यमांपासून दूर राहून कारखाना अडचणीत आहे. आणि त्यावरून थेट आरोप- प्रत्यारोपाला विरोधकांना संधी दिली नाही. त्याची सहानुभूतीही सत्ताधारी बागल गटाला कारखाना अडचणीत असतानाही मिळाली. बिले थकली आहेत. हा आरोप जेव्हा होऊ लागला तेव्हा इतर कारखान्याची उदाहरणे देण्यात येऊ लागली होती. याचा फायदा बागल गटाला झाला.
५) मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तालुक्यातील प्रमुख असलेल्या बागल विरोधी गटाने भूमिका स्पष्ट केली नाही. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी प्रा. रामदास झोळ यांना पाठींबा जाहीर केला. मात्र माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप सोडले तर त्यांच्या गटाचाही थेट यात सहभाग दिसला नाही. आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील यांनीही यात थेट भूमिका घेतली नाही. पाटील यांनी तर उलट कारखाना बिनविरोध करण्यासाठी जिंतीत प्रयत्न केले होते. मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविताराजे राजेभोसले याही शेवटी प्रचारात थेट दिसल्या नाहीत.