करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील नागरिक संघटनेचे नेते कन्हैयालाल देवी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सूर्यकांत पाटील व दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांचा भाजप प्रवेश मुहूर्त ठरला आहे. उद्या (मंगळवार) मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असून करमाळ्यातील गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या प्रवेशांमुळे करमाळ्यात भाजपला फायदा होणार आहे. कन्हैयालाल देवी यांना मानणारा करमाळा शहरात एक वर्ग आहे. करमाळा अर्बन बँकेचे ते अध्यक्ष आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे ते विश्वासू म्हणून ओळखले जातात. माजी आमदार शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कायम नेते मानतात. त्यांच्या या भाजप प्रवेशाचा नगरपालिका निवडणुकीत फायदा होईल असे बोलले जात आहे.
सूर्यकांत पाटील यांनी अखंड शिवसेनेत काम केले होते. ते शिवसेनेचे कट्टर मानले जात होते. त्यांनी मकाई सहकारी साखर कारखान्यात व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून काम पाहिले होते. सध्या ते माजी आमदार शिंदे यांच्याबरोबर होते. त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. आता त्यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. प्रा. रामदास झोळ हे गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना 4 हजार 791 मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांनी प्रचंड खर्च करूनही त्या तुलनेत मते मिळाली नाहीत अशी चर्चा तालुक्यात आहे. वाशिंबे ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या पत्नी माया झोळ या सदस्य आहेत. त्यांचा सरपंच पदावर पराभव झाला होता. तालुक्यात आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी पॅनल देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पूर्ण पॅनल झाला नव्हता. करमाळा अर्बन बँकेच्या निवडणुकीतही ते उतरले होते. परंतु त्या निवडणुकीत देवी यांचा पॅनल विजयी झाला होता.
कंदरचे माजी सरपंच भास्करराव भांगे, दत्तात्रय जाधव व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांचाही प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये भांगे व जाधव यांच्याही संपर्क झालेला नाही. तर गुटाळ यांनी मात्र माझा प्रवेश नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.