करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात सीना नदीवर खडकी, संगोबा, तरटगाव व पोटेगाव हे कोल्हापूर पद्धतीचे लघु पाटबंधारे आहेत. यातील पोटेगाव बंधारा नादुरुस्त आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पुढाकारातून निधी उपलब्ध झाला आहे. दुसरीकडे सुस्थितीत असलेल्या तरटगाव बंधाऱ्याच्या देखभालीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. यामुळे बंधाऱ्याला धोका होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
तरटगाव बंधाऱ्यातील पाण्याचा आळजापूर, तरटगाव, खडकी, जवळा, बिटरगाव श्री मधील शेतकऱ्यांना उपयोग होतो. या बंधाऱ्याची दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती झाली होती. आता या बंधाऱ्यावर तीन ठिकाणी वडाची व पिंपळाचे झाड आले आहे. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर या झाडांमुळे बंधाऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो.