सोलापूर : माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर आणि जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या वतीने ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित २२ जूनपर्यंत भारतीय योग पद्धती, विविध योगासने, प्राणायम, ध्यान याविषयी माहिती देणा-या मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृह येथे करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.
सदर प्रदर्शनामध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या ४५ मिनिटाचे कॉमन योग प्रोटोकॉल अनुसार प्रार्थना, शिथिलीकरण, दंड स्थितीतील ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, बैठक स्थितीतील दंडासन, भद्रासन/बध्दकोनासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन उष्ट्रासन, शशांकासन, उत्तान मंडूकासन, वक्रासन, पोटावर झोपून करावयाची आसने मकरासन, भुजंगासन, शलाभासन, पाठीवर झोपून करावयाची आसने सेतुबंध सर्वांगासन, उत्तानपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, प्राणायाम, ध्यान, संकल्प आणि शांति पाठ या विषयी सविस्तर छायाचित्र व मजकूर सहित माहिती असणार आहे. खास विद्यार्थ्यासाठी प्राचीन योग विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनमध्ये एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून योगाचा इतिहास, पंतप्रधान, आयुष मंत्रालयाचे मंत्री, योग गुरु, चित्रपट सृष्टीतील कलाकार, खेळाडू आणि साहित्यिक यांचे योगाविषयीचे मनोगत यावेळी नागरिकांना बघता येणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते २१ जूनला सकाळी ८.३० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिता शिंदे, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त डॉ राजेंद्र माने, सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे आणि जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ०६ वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे.
प्राचीन व शात्रोक्त असेलेल्या भारतीय योगाची माहिती व जाणीव जागृती व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त युवा, विविध सामाजिक व क्रीडा संस्था, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले आहे.