करमाळा (अशोक मुरूमकर) : वीट येथे तीन वर्षांच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समर्थ आनंद भिसले असे त्याचे नाव आहे. उपलब्ध माहितीनुसार आज (गुरुवार) तुकाराम बीज निमित्त वीट येथील रेवणनाथ महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दुपारी मंदिरात फुले टाकण्याचा कार्यक्रम झाला.
दरम्यान मंदिरातून हा चिमुकला गायब झाला. नेमका तो कोठे गेला याचा शोध सुरु झाला. मात्र तो कोठेही सापडला नाही. संबंधित मुलगा कोणाच्या मागे लागून किंवा कोणाबरोबर गेला आहे का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. सोशल मीडियावर देखील संबंधित मुलगा कोणाला दिसला का? कोणाच्या घरी आला आहे का? अशी विचारपूस झाली होती. संबंधित मुलगा हरवला आहे तरी कोणास आढळल्यास त्वरित संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले होते. याबाबत नातेवाईकांनी पोलिस ठाणे देखील गाठले होते. गावात देखील त्याचा शोध सुरु होता. दरम्यान गावातच मंदिर परिसरात त्याचा मृतदेख आढळून आला, असे सांगितले जात आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अतिशय मन हेलावून टाकणारी ही दुःखद घटना असून यामुळे संपूर्ण वीटवर शोककळा पसरली आहे. श्री रेवणनाथ महाराज मंदीराच्या मागे नागाईच्या विहीरीत पडुन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय भिसले यांचा तो नातू तर आनंद भिसले यांचा तो मुलगा होता.
