करमाळा (अशोक मुरूमकर) : सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यकर्त असलेले वीट येथील उदय ढेरे (वय ४२) यांचा आज (बुधवारी) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजई असा परिवार आहे. ढेरे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पत्नी वंदना या वीटच्या २०१७ ते २०२२ दरम्यान लोकनियुक्त सरपंच होत्या तर आई रंजना यांनी देखील वीटचे उपसरपंच म्हणून काम पाहिले होते.
करमाळ्यात एका खाजगी रुग्णालयात त्यांना सकाळी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थीव करमाळा उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदनासाठी दाखल केले आहे. वीट येथील तळे वस्ती येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंतसंस्कार होणार आहेत, असे सांगितले जात आहे.
ढेरे हे राजकारणात सक्रिय होते. २०१४ मध्ये त्यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात काम सुरु केले. शिंदे यांचे ते विश्वासू मानले जात होते. शिंदे करमाळ्याच्या राजकारणात येण्यापूर्वी ते त्यांचे कुटुंब बागल गटात सक्रिय होते. त्यांच्या आई बागल गटाच्या मदतीने उपसरपंच झाल्या होत्या, असे सांगितले जात आहे. ढेरे हे गावातील प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत होते. त्यांच्या जाण्याने वीटची मोठी हानी झाली असल्याचे बोलले जात आहे.