करमाळा (सोलापूर) : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आज (बुधवार) भोपळा दाखवून निषेध केला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे.
माजी आमदार पाटील म्हणाले, अर्थसंकल्पात बिहार व आंध्रप्रदेशला केंद्र सरकारने निधी दिला आहे. मात्र महाराष्ट्रला निधी दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले यश मिळाले आहे. त्या द्वेषातून भाजपने महाराष्ट्राला निधी दिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, महाराष्ट्राला खूप कमी निधी दिला आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय असून याचा आम्ही निषेध करत आहोत. महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाने आम्ही हे आंदोलन करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे म्हणाले, केंद्र सरकारने रोष मनात ठेऊन महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. यावेळी केंद्र सरकाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.