वामनराव बदे व मस्कर यांचा आमदार पाटील गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब मस्कर यांनी आमदार नारायण पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. याचा शिंदे गटाला फटका बसणार आहे.

जेऊर येथील आमदार पाटील यांच्या कार्यालयात बदे व मस्कर यांनी प्रदीर्घ चर्चा करून पाटील गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रमोद बदे, उमरड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय गणपत बदे, रामचंद्र पडवळे, भागवत बदे, अनिल बदे, अतुल मस्कर यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी पाटील गटात प्रवेश केला.

करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, राजन पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक, पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर, अंगद पठाडे आदी उपस्थित होते. आमदार पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मस्कर म्हणाले, बदे व मी आमदार पाटील गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. करमाळा तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देत यापुढे आम्ही पाटील गटात काम करणार आहोत. पाटील यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण करत विकासाच्या वाटेवर करमाळा तालुक्यास सतत पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. त्यांच्या विकासात्मक दृष्टीकोनामुळे पाटील गटाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.

बदे यांनी यापूर्वी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची धुरा वाहीली असल्याने त्यांचे करमाळा तालुक्यातील सर्वच भागात कार्यकर्ते, हितचिंतक व सहकारी आहेत तर मस्कर यांनी आदिनाथ व करमाळा पंचायत समितीचा कारभार महत्वाच्या पदावर राहुन काम केल्याने त्यांच्याही अनुभवाचा व राजकीय ताकदीचा फायदा पाटील गटास मिळणार आहे. २०१९ च्या विधानसभा सभा निवडणुकीत शिंदे यांना आमदार करण्यात बदे व मस्कर यांचे योगदान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *