करमाळा (अशोक मुरूमकर) : महसूल पंधरवाडा दिनानिमित्त करमाळा तहसील कार्यालयात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात महसूल दिन साजरा केला जातो. करमाळ्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार महसूल दिनानिमित्त तालुक्यात कार्यक्रम झाले.
महसूल पंधरवाडा दिनानिमित्त तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्यासह पोलिस बांधवांनीही सहभाग घेतला. यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर उपस्थित होत्या. महसूल दिनानिमित्त तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने दिव्यांगाना रेशनकार्ड वाटपही करण्यात आले. तहसीलदार ठोकडे यांनी महसूल दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे ‘युवा मार्गदर्शन’मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरकारच्या विविध योजना व करिअरच्या वाटा यावर मार्गदर्शन केले.
महसूल पंधरवाडा निमित्त निवडणूक शाखेच्या वतीने नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादीच्या नावात दुरुस्ती करण्यात आली. याबरोबर नवीन मतदार नोंदणीसाठी मोहीम राबवण्यात आली. याशिवाय कार्यालयीन स्वच्छताही करण्यात आली. या पंधरवड्यात शेतकर्यांनाही मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये माती परीक्षण व पीकपद्धती यावर कृषी सहाय्यक यांच्या मदतीने मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. महसुलाचे नायब तहसीलदार काझी व निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे यांनीही हा पंधरवाडा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.
तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, महसूल पंधरवाडा दिनानिमित्त करमाळा तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. मंडळ अधिकारी कार्यलयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत जनजागृती करून लाभार्थींचे अर्ज भरून देण्यात आले. केम येथे कृषीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. एक हात मदतीचा मध्ये लाभार्थींनी शासकीय मदत करण्यात आली. सैनिकांच्या परिवारांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या उत्सहात हा महसूल पंधरवाडा झाला आहे.