करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज (मंगळवारी) करमाळा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोणावरही टीका न करता संजयमामा शिंदे यांना पुन्हा आमदार करण्याचे आवाहन केले आहे. आमदार शिंदे यांचे करमाळ्यातील प्रतिस्पर्धी माजी आमदार नारायण पाटील यांचाही त्यांनी नामोल्लेख केला नाही. मात्र त्यांचे वडील स्व. गोविंदबापू पाटील यांनी आदिनाथ कारखान्यासाठी दिलेले योगदान आणि त्या कारखान्याची सध्याची परस्थिती यावर ते बोलले. आणि आदिनाथसह मकाईला सुस्थितीत आणायचे असेल तर संजयमामा शिंदे यांना पुन्हा आमदार करा असे ते म्हणाले आहेत.

आमदार शिंदे हे अपक्ष आहेत सुरुवातीपासूनच ते अजितदादा यांना नेते मानतात. २०१९ ची निवडणूक झाल्यापासून ते अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्याचाही उल्लेख उपमुख्यमंत्री पवार यांनी केला. ‘मला मंत्री नको किंवा इतर काही नको. फक्त करमाळ्याच्या विकासासाठी निधी द्या’, असे ते म्हणाले होते आणि त्याप्रमाणे मी निधी दिली. निधी देणे हे माझ्या हातात होते, असे पवार म्हणाले. पाच वर्षात त्यांना ३ हजार कोटी निधी दिला आहे. कोरोना आणि राजकीय सत्तासंघर्ष नसता तर हा निधी पाच हजार कोटी झाला असता असे ते म्हणाले. राहिलेली सर्व कामे करण्यासाठी पुन्हा संजयमामा यांना आमदार करा असे आवर्जून ते म्हणाले. हे सांगत असताना मामा नेमके कोणत्या चिन्हावर असतील हे मात्र त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे मामा अपक्ष राहतील, अशी चर्चा जोर धरू लागली.

करमाळ्याच्या दृष्टीने महत्वाची आसली कुकडी उजनी उपसासिंचन योजना यावरही पवार बोलले. याशिवाय दहिगाव उपसासिंचन योजनेमध्ये गावांचा समावेश करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. आतापर्यंतच्या आमदारांपैकी सर्वात जास्त निधी आमदार शिंदे यांनी आणला असल्याचे पवार यांनी सांगत. तालुक्यात कोणत्या कामांना किती निधी दिला हे सांगितले. अजितदादा पवार यांच्या दौऱ्यामुळे आमदार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतरचा आणि विधानसभेच्या तोंडावरचा हा मेळावा होता.

या मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. करमाळा येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर कमलाभवनी देवीचे त्यांनी दर्शन घेतले. आमदार शिंदे व पवार हे एकाच गाडीत होते. त्यानंतर प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन झाले. तेथे इमारत चांगली करा असा सल्ला देत प्रशासनाकडून त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर झरे फाटा येथे हॅमअंतर्गत होणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आणि त्यानंतर जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने त्यांनी महिलांशी संवाद साधला. तेथून पुन्हा करमाळ्यात येऊन त्यांनी सावंत यांच्या घरी स्नेहभोजन घेतले. त्यानंतर पाऊस सुरु झाल्यामुळे त्यांना ‘बायकार’ बारामतीला जावे लागले. यावेळी आमदार शिंदे हे त्यांच्याबरोबर होते.

सावंत यांच्या घरी स्नेहभोजन झाल्यानंतर त्यांनी बंद दाराआड सावंत परिवाराचे सुनील सावंत, ऍड. राहुल सावंत व संजय सावंत यांच्याशी संवाद साधला. आमदार शिंदे हे त्यांच्याबरोबर होते. मात्र त्यांच्याशी काय सवांद झाला हे समजलेले नाही. या दौऱ्यामुळे शिंदे यांचा नक्की फायदा होणार आहे. मात्र प्रशासकीय भवन करमाळा शहराबाहेर जात असल्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जाऊ लागली असून त्याला शिंदे गट येणाऱ्या काळात कसा समोर जाईल हे पहावे लागणार आहे.

आमदार शिंदे यांच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. आणि ते त्यांना बळ देत आहेत हे यावरून सिद्ध झाले आहे. आमदार शिंदे हे विधानसभा निवडणुकीत अपक्ष उतरले तरी ते विजयी होतील यासाठी त्यांनी प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे. याचे कारण पवार साहेब हेच आमचे दैवत असल्याचे विधान अजित पवार यांनी केले. त्याचाही शिंदे यांना करमाळ्यात फायदा होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *