करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस लांबल्याने तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या करमाळा तालुक्यात येणार आहेत. मात्र याच कालावधीत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. मानाच्या पालख्यांपैकी एक असलेली श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रावगाव येथून जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर येथे तीन पाणी टँकर देण्यात येणार आहेत. याशिवाय आणखी काही गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे.
यावर्षी जून निम्मा झाला तरी पाऊस पडला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आठ दिवसात पाऊस झाला नाही तर पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. आता पाणी साठे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. यातूनच वरकुटे येथे बोअर अधिग्रहनचा प्रस्ताव आला असल्याची माहिती आहे. याशिवाय घोटी येथे पाणी टंचाई निर्माण झाली असून येथे टँकरची मागणी करण्यात आली आहे.
रावगाव येथे पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाण्याची व्यवस्था म्हणून तीन टँकर दिले जाणार आहेत. त्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सध्या येथे खासगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
घोटीत टँकर सुरु करा
तालुक्यातील घोटीत वाड्यावस्त्यांवर काहीप्रमाणात पाणी आहे. मात्र गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी भटकंती सुरु असून येथे त्वरित टँकर सुरु करावा, अशी मागणी येथील प्रशांत शिंदे यांनी केली आहे. या आठवड्यात या भागात दिंड्यांच्या माध्यमातून वारकरी येणार आहेत. त्यामुळे पाणी व्यवस्था होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत.
रावगावमध्ये टंचाई
रावगामध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. येथे सध्या टँकर सुरु आहे. मात्र हा टँकर कायम राहणार आहे की नाही याची माहिती नाही. पाणीसाठी भटकंती होऊ नये म्हणून येथे कायमस्वरूपी टँकर सुरु करावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केली आहे.
जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु करा
नेर्ले येथेही टंचाई निर्माण होऊ शकते. पाऊस लांबलेला आहे. वेळीच पाऊस झाला नाही तर तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे. ही टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जेऊर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सुरु करणे गरजेचे आहे, असे नेर्ले येथील औदूंबरराजे पाटील यांनी सांगितले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. नेरले गावासह तालुक्यातील १० गावांच्या जमिनी खरेदी विक्री व्यवहार सीना कोळगाव प्रकल्पाचे काम सुरू केल्यापासून बंद केला आहे. प्रकल्पाचे पाणी नेरलेसह या दहा गावांना द्यायचे म्हणून परंतु आत्तापर्यंत एक थेंबही पाणी नेरले गावाला सीना कोळगाव प्रकल्पाचे आलेले नाही. आता प्रकल्पमध्ये पाणी भरपूर शिल्लक आहे ते देखील पाणी कॅनलद्वारे सोडले तर शेतकऱ्यांचे पिके वाचतील आणि पिण्याच्या पाण्यासाठी जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू केली पाहिजे व काही ठिकाणी टँकर देखील सुरू केले पाहिजेत, असे ते म्हणाले आहेत.
पालखी सोहळ्यासाठी रावगाला टँकर
रावगाव येथे पाणी टंचाईमुळे पालखी सोहळ्यासाठी टँकर देण्यात आला आहे. वरकुटे येथील बोअर अधिग्रहनसाठी प्रस्ताव आला असून घोटीसह इतर काही ठिकाणी पाणी टंचाई जाणवत असल्याची माहिती आहे. पाणी टंचाई असलेल्या गावात कायद्यानुसार मार्ग काढला जाईल, असे गटविकास अधिकार मनोज राऊत यांनी सांगितले आहे.