सर्वांचे लक्ष लागलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवारी) मतदान होत आहे. तेलंगणापूर्वी छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेसाठी मतदान झाले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी (३ डिसेंबरला) होणार आहे. तेलंगणात मुख्य लढत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (BRS), काँग्रेस आणि भाजप यांच्यात असल्याचे मानले जात आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (काय सांगता न्यूज पोर्टल)
लोकसभा निवडणुकीपूर्वी या निवडणूका होत असल्याने महत्वाच्या मानल्या जातात. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. तेलंगणात 35 हजार 655 मतदान केंद्रे आहेत. तेथे 3.26 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत १०६ मतदारसंघात आणि १३ डाव्या विचारसरणीच्या (एलडब्ल्यूई) प्रभावित मतदारसंघांमध्ये सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
बीआरएसने सर्व म्हणजे 119 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजप 111 जागांवर निवडणूक लढवत आहे, उर्वरित आठ जागा अभिनेता पवन कल्याणच्या नेतृत्वाखालील जनसेनेसाठी सोडल्या आहेत. काँग्रेसने मित्रपक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला (सीपीआय) एक जागा दिली आहे आणि उर्वरित 118 जागांवर निवडणूक लढवत आहे.
येथे असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नऊ जागांवर निवडणूक लढवत आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, बीआरएस प्रमुख केसीआर आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रचार केला आहे. ‘पीटीआय’नुसार तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीत 2 हजार 290 उमेदवार आहेत. सीएम केसीआर, त्यांचा मुलगा आणि मंत्री केटी रामाराव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष ए रेवंत रेड्डी आणि भाजप लोकसभा सदस्य बी संजय कुमार आणि डी अरविंद यांचा समावेश आहे. (काय सांगता न्यूज पोर्टल)