करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल (रविवारी) गणेश चिवटे यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. विवाह स्थळावरून परतत असताना त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ‘थांबा आणि पहा’ असा सूचक इशारा दिला आहे. मात्र हा इशारा कोणासाठी आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पालकमंत्री गोरे हे पहिल्यांदाच करमाळा दौऱ्यावर आले होते. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व होते. माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, शिवसेनेचे महेश चिवटे, मंगेश चिवटे, भाजपचे जगदीश अगरवाल, रामा ढाणे आदी उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
पत्रकारांनी त्यांना बेकायदा वाळू उपशाबाबत प्रश्न केला. तेव्हा त्यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगतानाच त्यांनी ‘थांबा आणि पहा’ असे म्हणत त्यांनी सूचक इशाराही दिला आहे. मात्र हा इशारा नेमका कोणाला आहे याची चर्चा सुरु झाली आहे. विवाहस्थळावरून चिवटे हॉटेल येथे त्यांनी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्याशीही संवाद साधला. तेथे नेमकी काय चर्चा झाली हे समजले नाही पण ‘थांबा आणि पहा’ या पालकमंत्री गोरे यांच्या इशाऱ्याबाबत तर चर्चा झाली नाही ना? असा तर्क लावला जात आहे.
करमाळा तालुक्यात बेकायदा वाळू उपशाबाबत चर्चा सुरु आहेत. प्रशासनाने ३९ वाळू माफियांना ११० प्रमाणे नोटीस दिल्या आहेत. त्यावर वाळू उपसा थांबला नाही तर तडीपारची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पथकाने बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटी देखील नष्ट केल्या होत्या. त्यात आता पालकमंत्री नेमके काय करणार आहेत याकडे लक्ष लागले आहे. यावेळी वाळू धोरणाबाबतही त्यांना विचारण्यात आले. त्यावरही त्यांनी थांबा आणि पहा असे म्हणाले आहेत.