खातगाव ही भूमी सखाराम बाबांच्या पदस्पर्शानी पावन झालेली आहे. भिमा नदीच्या तीरावर वसलेले हे गाव उजनी धरणाच्या निर्मीतीनंतर वेगवेगळ्या खातगावमध्ये विभागले! धरणाच्या निर्मितीमध्ये अनेकांच्या जमीनी उजनी जलाशयासाठी संपादित झाल्या. उजनीसाठी खातगावकरांनी मोठा त्याग केला. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून खातगावकरांनी प्रगती साधली.
काही दिवसांमध्ये खातगावची ओळख गावाबाहेरील काही वाळू माफियांमुळे बदनाम झाली आहे. गावातील निवडक लोकांच्या वेगळ्या भूमिकेमुळे बाहेरील लोक गावात दहशत पसरवून आपला अवैध व्यवसाय राजरोसपणे करण्याचा प्रयत्न करत आहेत. गावातील काही लोक स्वतःचे इमान गहाण ठेवून अवैध वाळू उपसा करणा-यांना पाठिशी घालत आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार जिल्ह्य़ातील अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद करण्यात आलेला आहे. यामध्ये सहभागी असणा-या सर्वांवर शासन ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ यानुसार समस्त खातगावकरांनी ठरवले तर वाळूचा एक कण देखील अवैध रित्या काढला जाणार नाही. या अवैध गोष्टीला पाठिंबा देणा-या गावातील लोकांना खड्यासारखे बाजुला सारून ‘गाव’ म्हणून या बेकायदेशीर कृतीचा विरोध आणि बिमोड केला पाहिजे.
वाळू माफियांना कोणती जात, धर्म नसतो. चवली- पावलीच्या तुकड्यावर ते गावातील लोकांना आपलेसे करतात. गावातील रस्ते खराब होतात, दुर्देवाने अपघात घडू शकतात. गावात गुन्हेगारी वाढीस लागते. समस्त खातगावकरांनो आपल्यातील स्वाभिमान जागवून वाईट गोष्टीला विरोध केलाच पाहिजे. काल रात्री उजनी जलाशयालगत संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. आपणच ठरवा दुष्ट प्रवृत्तींना साथ द्यायची की खातगावची अस्मिता जपायची. खातकरांनो एकी दाखवून गावाची ओळख जपूयात… गावातून अवैध वाळू उपसा व वाहतूक होवू द्यायचाच नाही यासाठी वज्रमूठ बांधुयात…
- एक संवेदनशील खातगावकर