करमाळा (सोलापूर) : वादळी वाऱ्याने भीमा नदीवरील उजनी जलाशयात बोट उलटून सहाजणांचा बळी गेल्याची दुर्घटना झाल्यानंतर कुगाव (करमाळा) ते कळाशीची (इंदापूर) जलवाहतुक बंद होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतहोती. नियम घालून ही वाहतूक सुरू करण्याची मागणी या भागातून केली जात होती. पावसाळी अधिवेशनात आमदार संजयमामा शिंदे यांनी हा प्रश्न मांडला होता. दरम्यान या वाहतुकीला तात्पुरती मान्यता मिळाली आहे. लाईफ जॅकेटचा वापर करून येथे वाहतूक करण्यास ही परवानगी देण्यात आली आहे.
करमाळा ते इंदापूर या दोन्ही तालुक्याला जोडण्यासाठी महायुती सरकारने पूल मंजूर केला असून त्याचे कामे सुरू होण्यास कालावधी लागणार आहे. दरम्यान या दोन तालुक्यातील दळणवळण व्यवस्थित व्हावे यासाठी आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याने उजनी धरणावरील जलवाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मान्यता दिली आहे. लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष बैठक घेतली जाणार आहे, असे कुगाव दूध संस्थेचे अध्यक्ष सचिन गावडे यांनी दिली.
आमदार शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांतअधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, उजनी धरण व्यवस्थापन भीमानगरचे श्री. मोरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे धिरज साळे यांना याबाबत तोडगा काढण्याचे सुचविले होते. विद्यार्थी व रुग्ण अशी अत्यावश्यक बाब लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात लाईफ जॅकेटचा वापर करून जलवाहतूक करण्यास मान्यता दिली आहे.