न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळाला : माजी आमदार शिंदे

करमाळा (अशोक मुरूमकर) : राजकीय दबावापोटी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संशय व्यक्त करून आरोपाच्या पिंजऱ्यात अडकवण्यात आले होते. मात्र न्यायदेवतेच्या मंदिरात उशीरा का होईना पण मला न्याय दिला आहे. या निकालाचा पूर्णपणे आदर करत असून न्यायदेवतेवर कोणाचाही दबाव चालत नाही हे यावरून सिद्ध झाले आहे. सामान्य नागरिकांनी यापुढे अशा भूलथापांना बळी पढू नये असे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

२०१४ च्या करमाळा विधानसभा निवडणूकीवेळी भाळवणीजवळ सहा जणांनी संजयमामा शिंदे यांचे प्रचार साहित्य, मतदार याद्या व त्यांचे मुखवटे घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून मतदारांना पैशाचे आमिष दाखवून पैसे वाटल्याचा आरोप झाला होता. दरम्यान याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा निकाल करमाळा न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर माजी आमदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय बदनामी करण्यासाठी आरोप केले जात आहेत. त्यात काहीही तत्थ्य नाही. सामान्य नागरिकांनी अशा भुलथापांवर विश्वास ठेऊ नये, असे ते म्हणाले आहेत.

राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा होती. याप्रकरणात दोघांना अटकही झाली होती. त्यांच्या जवळील एक कार व दोन दुचाकी वाट निवडणूक प्रचार साहित्य व रोख रक्कम जप्त झाली होती. हा प्रकार शिंदे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय पोलिसांनी फिर्यादीत व्यक्त केला होता. या फिर्यादीत शिंदे यांचाही संशयित म्हणून समावेश होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एस. माने यांच्याकडे होता. या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी यांच्यासमोर झाली. यामध्ये १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

ऍड. प्रमोद जाधव यांनी शिंदे यांची बाजू मांडली. ‘संशयित आरोपींना गैरमार्गाने व राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुंतविलेले आहे. या घटनेशी त्यांचा संबंध नाही. शिंदे हे तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार होते. त्यांची राजकीय बदनामी करून त्यांना अडचणीत आणण्यासाठी हा गुन्हा दाखल केल्याचे’ त्यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. सचिन लुनावत यांनी काम पाहिले. ऍड. जाधव व ऍड. सुनील रोकडे यांनी संशयितांतर्फे काम पाहिले‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *