करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी (बागल व शिंदे) एकत्र येणार आहेत. त्यात मी निवडणूक लढविणार होतो तो पांडे गण भाजपकडे गेला असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आमचे नेते माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा आदेश मानून पुढील निर्णय घेणार आहे, असे शिंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते प्रवीण घोडके यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
घोडके म्हणाले, माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आम्हाला कायम बळ दिले आहे. त्यांचा आदेश मानून आम्ही काम करत आहोत. पांडे गणातून निवडणूक लढविण्यासाठी गावातील कार्यकर्त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्याकडे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांच्या माध्यमातून इच्छुक मुलाखत दिली होती. मात्र तालुक्यात शिंदे गट वाढणे आवश्यक आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आमचे नेते माजी आमदार शिंदे यांच्या निर्णयानुसार आम्ही काम करणार आहोत. येणार काळातही आम्ही त्यांचाच आदेश मानून काम करत राहणार आहे. त्यांच्या सूचनेनुसार उमेदवार विजयी करण्यासाठी काम करणार आहोत, घोडके यांनी म्हटले आहे.
