करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी करमाळा दौऱ्यावर येत आहेत. आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष असले तरी सुरुवातीपासून त्यांना नेते मानतात. २०१९ ची विधानसभा निवडणूक झाल्यापासून आमदार शिंदे हे करमाळा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. त्यातून अजितदादांनी करमाळ्यासाठी काय दिले आणि काय राहिले यांची चर्चा दौऱ्याच्या निमित्ताने सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची २०१९ ते २०२४ ही ऐतिहासिक पंचवार्षिक ठरली आहे. निवडणूक झाली आणि कोणाचाही विश्वास बसणार नाही असे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्र येत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हे सरकार कोसळेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस व शिंदे यांनी एकत्र येत महायुतीचे सरकार स्थापन केले. त्यात अजित पवार हे सहभागी झाले आणि पुन्हा ते उपमुख्यमंत्री झाले. ह्या सर्व कालखंडात आमदार शिंदे हे अपक्ष असले तरी उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर ते राहिले आणि करमाळ्याच्या विकास कामासाठी निधी खेचून आणला. कोरोना कालावधीमुळेही कामांवर परिणाम झाला. या कालावधीत पहाटेचा शपथविधीही चर्चेत राहिला. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याने अजितदादांनी काय दिले आणि काय राहिले हे देखील चर्चेत राहिले आहे.
आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याने अजितदादांनी काय दिले… (ठळक कामे)
१) दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंदनलिकेला निधी
२) करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीला निधी
३) बहुचर्चित टेंभुर्णी- जातेगाव (नगर) महामार्गाला राज्य सरकारची एनओसी मिळवून दिली आणि त्यासाठी निधीही उपलब्ध झाला.
४) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागासाठी महत्वाचा असलेला डिकसळ पूल मंजूर (पुणे व सोलापूर जिल्ह्याला जोडणारा)
५) कुकडी उजनी उपसासिंचन योजनेच्या सर्व्हेक्षणासाठी निधी
६) पर्यटन विकास आराखडा
७) हॅम अंतर्गत रस्ता मंजूर
८) शेतीच्या विजेसाठी वीज उपकेंद्र
९) चिखलठाण ते जेऊर यासह इतर रस्ते
१०) जिल्हा सत्र न्यायालयास मान्यता
११) प्रशासकीय इमारत, नगरपालिका, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी निधी
अजित पवार यांच्याकडून या आहेत अपेक्षा
१) पोमलवाडी ते चांडगाव पुलासाठी निधी
२) जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे काम मार्गी लागावे
३) दहिगाव उपसासिंचनमध्ये वाढीव गावांचा समावेश होणे
४) मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी येणे
५) केळी संशोधन केंद्र उभारण्यास मान्यता
6) गोयेगाव ते आगोती पुल