करमाळा : ‘कोरोना काळात आरोग्याची आणीबाणी आली होती. या काळात संसर्गाच्या भीतीने भाऊ भावापासून लांब चालला होता. त्या काळात ‘आरोग्य सेवक’च धावून आले होते. कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय रुग्णांची काळजी घेत होता. त्यामुळे आरोग्य सेवकांच्या कामाचे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे,’ असे प्रतिपादन साताऱ्याचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले.
करमाळा येथील महादेव बाळा कोष्टी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘एम. बी. कोष्टी उत्कृष्ट आरोग्य सेवक पुरस्काराचे ‘जागतिक आरोग्य दिना’च्या पार्श्वभूमीवर सातारा येथे वितरण करण्यात आले. यंदाचा पुरस्कार ‘एम. बी. कोष्टी उत्कृष्ट आरोग्य सेवक पुरस्कार’ खावली येथील ‘आरोग्य सेवक’ दादासाहेब पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमंत माळवे, जिल्हा विस्ताराधिकारी महेश पिसाळ, वाईचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय भोईटे, दीपक शिंदे उपस्थित होते.
सतीश बुद्धे म्हणाले, ‘कोरोनामुळे आपल्याला आरोग्य ही किती महत्त्वाची बाब आहे, हे दाखवून दिले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच आरोग्य सेवक कशाचीही तमा न बाळगता रुग्ण सेवा बजावत असतात. हीच परंपरा यापुढेही कायम ठेवावी.’ डॉ. राजेंद्र जाधव म्हणाले, ‘आरोग्य सेवक हे गावोगावी तळागाळात काम करत असतात. त्यांना कामे करताना प्रचंड अडचणी येत असतात. अनेकजण त्रास देतात; पण आपले काम चोख असल्यास कोणीही तुमच्याकडे बोट दाखवणार नाही. आपण पगार घेतो म्हणून काम करत असलो तरी काही सामाजिक दायित्वातून काम केले पाहिजे. समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी धडपडत असताना स्वत:च्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका. काही व्यसने असतील तर ती बंद करण्याचा प्रयत्न करा. योगा करत जावा. किमान चालण्याचा व्यायाम करत जावा.’
महेश पिसाळ म्हणाले, ‘सध्या उन्हाळा वाढत आहे. पाण्याची कमतरता असल्याने कीटकजन्य रोगांचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आरोग्य सेवकांनी सतर्क राहावे. कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढू नये म्हणून जनजागृती करावी.’ जगदीश कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य सहायक विशाल रेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रगती जाधव-पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शिल्पा कोष्टी यांनी आभार मानले. यावेळी सर्व तालुका हिवताप पर्यवेक्षक, आरोग्य सेवक उपस्थित होते.