करमाळा (सोलापूर) : सर्वसामान्य नागरिकांकडून होणारी मायक्रो फाईनान्सची बेकायदेशीर कर्ज वसुली त्वरित थांबवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी केली आहे. हा प्रकार थांबला नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
मनसेचे घोलप म्हणाले, मायक्रो फाईनान्सचे किरकोळ कर्ज लवकर मिळते, म्हणून गरजू ते कर्ज घेतात. कर्ज देताना त्यांची कर्ज फेडण्याची पत बघूनच कर्ज दिले जाते. परंतु एखादा हप्ता मागे पडला तरी मायक्रो फाईनान्सचे कर्मचारी कर्जदाराच्या घरी जाऊन बसतात व त्यांना कर्जाचे थकीत हप्ते लगेच भरा असा तगादा लावला जातो. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशीही ही वसुली सुरु असते. हप्ता दिल्याशिवाय घरातुन जाणार नाही असे सांगून दमबाजी केली जाते. घरी महिला असल्या तरी ते अपमानास्पद बोलतात, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले आहेत.
यावर जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, साहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार देणार आहोत व असे कर्मचारी करत असतील तरं त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली असून कर्ज वाटप कायदेशीर होत असेल तर कर्ज वसुली बेकायदेशीर का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. कर्जदारांना अनेक अडचणी असतात. कर्जदाराच्या घरी कोण आजारी असते, कोणाच्या घरी लग्नकार्य असते अशा अनेक अडचणी असतात. त्यामुळे हा प्रकार थांबला नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.