करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून कुकडी उजनी योजनाही पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. याचा सर्व्हे करण्यासाठी आपण निधी मिळवला आहे’, असे सांगत ‘एवढ्या दिवस रिटेवाडी उपसासिंचन योजना का झाली नाही?’ असा खोचक प्रश्न आमदार संजयमामा शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना लगावला आहे.
आमदार शिंदे यांची वीट येथे आज (शुक्रवार) प्रचार सभा झाली. आमदार शिंदे म्हणाले, ‘शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहिला आहे. वीज प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वीज उपकेंद्र उभारली आहेत. विरोधक ३००० कोटींच्या विकास कामाबाबत प्रश्न करत आहेत पण आपण तेवढा निधी आणला आहे. करमाळा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ससुशोभीकरण करणे यासह करमाळा व कुर्डवाडी शहरातील विविध कामे करण्यासाठी आपण निधी मिळवला’. अनेक कामे मंजूर आहेत, मात्र ती कामे होऊ नयेत यासाठी आडकाठी कशी आणली जाते, याबाबतही त्यांनी आज स्पष्टीकरण दिले.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, ‘पोटेगाव बंधारा हा विषय मी आल्यापासून ऐकत होतो मात्र त्याला कोणी प्रयत्न केला का. मी त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवला. रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी मी स्वतः तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. ही योजना क्रांतिकारी ठरणार आहे. याचा अभ्यास करून आम्ही काम करत आहोत. सध्या ही योजना कोणाची यावर प्रश्न केला जात आहे. मात्र योजना कोणाची हे महत्वाचे नसून या भागात पाणी कसे येईल याला मी महत्व देत आहे. पाच वर्षातील राजकीय परिस्थित अवघड होती तरीही ही योजना सर्व्हे करण्यासाठी मी निधी मिळवला. निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थिर झाल्यानंतर हा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले. मी फक्त विकासाचे राजकारण करत असून मला काम करण्याची संधी द्या’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मला निवडून येण्यासाठी लीडची गरज नाही. मला फक्त विकास करण्यासाठी मत द्या’, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. २०१४ ते १९ सारखा मला कालावधी मिळाला तर विकास कसा असतो हे दाखवतो, असेही ते म्हणाले आहेत.