करमाळा (अशोक मुरूमकर) : सरकारने ग्रामीण भागात गावांमध्ये २४ तास घरात वीज उपलब्ध व्हावी म्हणून कृषी व गावातील वीज पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा केली. मात्र गावातील वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीकडेही कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र असून अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने दुर्लक्ष देण्याची गरज आहे. पाऊस नसतानाही मांगी येथून वीज पुरवठा होणारी गावे दोन दिवस अंधारात राहिली आहेत. याला जबाबदार कोण आहे, असा प्रश्न भीमदलने केला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने प्रत्येक भागात शेती व घरगुती अशी स्वतंत्र यंत्रणा वीजपुरवठ्यासाठी केली आहे. मात्र व्यवस्थित देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने मांगी येथून घरगुती वीज पुरवठा होणारी यंत्रणा सतत बंद पडत आहे. वायरमन हजारो रुपये बेकायदा वसूल करीत असून वीजपुरवठा सुरळीत करण्याकडे मात्र दुलर्क्ष करत आहे.
बिटरगाव श्री सह परिसरातील गावांना रविवारची (ता. १८) रात्र अंधारात काढावी लागली. त्यानंतर मंगळवारी पाऊस नसतानाही वीजपुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा खंडित होण्याचा हा प्रकार सतत सुरु आहे. या भागात वायरमनचे वीज यंत्रणेकडे लक्ष नाही. पैसे घेऊन त्याने अनेक बेकायदा कामे केली आहेत. एक ट्रान्स्फार्मर जळालेला असून अधिकारी रजेवर असल्याचे सांगत तुम्ही वर्गणी करा, साहेब आल्यानंतर रिपोर्ट देतो, असे म्हणत पैसे उकळत आहे. मर्यादेपेक्षा जास्त वीज जोडणी दिली असल्याने दोन महिन्यात दुसऱ्यांदा ट्रान्फर्मर जळाला आहे. आता पुन्हा पैशाची मागणी केली जात आहे. दुसरीकडे तीन दिवसात बिटरगाव श्री दुसऱ्यांदा अंधारात राहिले आहे. बेकायदा वसुली आणि देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वायरमनवर वरिष्ठानी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.