करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये तुम्ही मला मदत केली होती’ असे म्हणत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे आमदार नारायण पाटील यांनी ‘करमाळा तालुक्यासाठी कुकडीचे पावसाळ्यात आम्हाला उचल पाणी द्या’, अशी मागणी केली आहे.
करमाळा तालुक्यातील पोथरे येथील ग्रामस्थांच्या वतीने विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा आज (शनिवार) सत्कार झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पाटील होते. आमदार पाटील म्हणाले, ‘कुस्ती क्षेत्रात मी होतो तेव्हा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व माझी ओळख झाली. तेव्हा ते चोंडीचे सरपंच होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या घराण्याशी त्यांचा संबंध आहे. त्यामुळे त्यांच्यावर राज्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे विशेष लक्ष आहे. त्यांच्यामुळे आपल्या समजाला उर्जित अवस्था येणार आहे.’
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी त्यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना खूप मोठी मदत केली होती. जेथे अडचण येईल तेथे ते स्वतः बोलत होते’, असे ते म्हणाले. ‘आपल्या नेत्यावर असंच सर्वांनी प्रेम करत रहावे. ज्या- ज्यावेळी प्रा. शिंदे यांचा येथे तुम्ही सत्कार कराल तेव्हा मला बोलवायला विसरू नका’, असेही ते म्हणाले. ‘रिटेवाडीच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करा असे आवाहन करताना आमदार पाटील म्हणाले, ‘कुकडीपासून करमाळ्याचे अंतर जास्त आहे. त्यामुळे आरक्षित असताना सुद्धा तेवढे पाणी करमाळ्याला येत नाही. पूर्वी कुकडीचे पाणी मांगी तलावात येत होते. मात्र आता कर्जत ते मांगी तलावदरम्यान नदीवर बंधारे झाले. त्यामुळे ते पाणी मिळत नाही. आम्हाला आमचे साडेपाच टीएमसी पाणी मिळत नाही. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी आम्हाला उचल पाणी करून या भागाला द्या. हे पाणी मिळाले तर आमचे नंदनवन होणार आहे’ असे ते म्हणाले.
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, ऍड. राहुल सावंत, सरपंच अंकुश शिंदे, पोलिस पाटील संदीप शिंदे पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, विठ्ठल शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, प्रा. आजिनाथ झिंजाडे, शशिकांत पवार, नितीन झिंजाडे, हरिभाऊ हिरडे, माजी सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर, भाजपचे रामभाऊ ढाणे, रासपचे अंगद देवकाते, काका सरडे, बाळासाहेब कुंभार, हरिभाऊ झिंजाडे, भाऊसाहेब खरात, प्रमोद झिंजाडे, अक्षय ठोंबरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच अंकुश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नेते हरिश कडू यांनी केले.