करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समग्र शिक्षा, जिल्हा परिषद सोलापूर, प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा विकसित करण्यासाठी करमाळा तालुक्यातून वाशिंबे येथील जिल्हा परिषद शाळेची निवड झाली आहे. या शाळेच्या 4 वर्गखोल्या विकसित करणे, हॉल, ग्रंथालय यासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सरपंच तानाजी झोळ यांनी दिली.
सरपंच झोळ म्हणाले, शाळेतील स्वच्छतागृह, पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, संरक्षक भिंत बांधणे, भांडारगृह बांधणेसाठी 30 लाख निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून जिल्हा परिषद वाशिंबेची शाळा आता तिचा लुक बदलेल, ती स्मार्ट होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून वाशिंबेच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणावर निधीची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गावचा विकास सुरू आहे. आत्तापर्यंत शाळा सुधारणेसाठी 45 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. त्यामधून जुन्या शाळेचे पत्रे बदलणे, भिंतींची दुरुस्ती करणे, रंगकाम करणे, नव्याने सुधारणा झाली आहे.