सोलापूर : केंद्र सरकारच्या परियोजनेतर्गंत राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 सी पंढरपूर- सांगोला रोड (भाग-2) रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु असून, सांगोला तालुक्यामधून संगेवाडी, मांजरी, बामणी या गावांमधून हा महामार्ग जात आहे. या मार्गाच्या बाधितांना भुसंपादन भरपाईचे मागणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी सोमवारी (ता. 30) संगेवाडी येथे सकाळी 11 वाजले पासून शिबीर होणार असल्याची माहिती भूसंपादन उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 सी पंढरपूर सांगोला रस्त्यासाठी सांगोला तालुक्यातील संगेवाडी, मांजरी, बामणी गावातील बाधित गटधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. परंतु सांगोला तालुक्यातील संगेवाडी या गावचे एकूण 73 गट धारकांपैकी फक्त 17 गट धारकांनी नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर केलेला आहे. संबधित भुसंपादनाचे नुकसान भरपाई मागणीचे प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन त्यांची त्वरीत तपासणी करुन नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यासाठी पुढील प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी गांव पातळीवर नुकसान भरपाई रकमेचे प्रस्ताव दाखल करुन घेणे, दाखल प्रस्तावामधील त्रुटींची पूर्तता करुन देणे, संबंधितांना आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगोला तालुक्यातील संबधित बाधितांनी संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आयोजित शिबीरामध्ये प्रस्ताव दाखल करावेत. तसेच शिबीरामध्ये नुकसान भरपाई मागणी प्रस्तावाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणेत येणार असल्याचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले.