मराठा समाजाच्या कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा युध्द पातळीवर कामाला लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळा व माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुणबी मराठा आहेत. ऑक्टोंबर २०२३ पर्यंत (२२ महिन्यात) सोलापूर जिल्ह्यातील ८७५ जणांना कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात करमाळा तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणपत्र दिले आहेत. ६०६ जणांनी अर्ज केले होते. त्यातील ५९९ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र दिले आहे. ७ नाकारलेले अर्ज आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यात ३ प्रमाणपत्र दिले आहेत. बार्शी तालुक्यात ११ प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. अक्कलकोट तालुक्यात ९ प्रमाणपत्र दिले आहेत. १ अर्ज नाकारला आहे. माढा तालुक्यात २४६ अर्ज आले होते. त्यातील २४२ प्रमाणपत्र देण्यात आले. तर ४ अर्ज नाकारले आहेत. पंढरपूर तालुक्यात ३ अर्ज आले होते. त्यातील दोघांना प्रमाणपत्र देण्यात आले तर १ प्रलंबित अर्ज आहे. मोहोळ तालुक्यात १ अर्ज तोही प्रलंबित आहे. सांगोला तालुक्यात १ प्रमाणपत्र दिले आहे. माळशिरस तालुक्यात ८ प्रमाणपत्र दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात २२ महिन्यात कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी ८८९ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८७५ जणांचे अर्ज पात्र झाले आहेत. १२ जणांचे अर्ज नाकारण्यात आले असून दोन जणांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. दक्षिण सोलापूर व मंगळवेढा तालुक्यातून एकही अर्ज प्राप्त झाला नाही. ‘कुणबी मराठाचे पुरावे मिळाल्यानंतर ते स्कॅन करून सर्वांना पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाणार आहेत. या शिवाय गावनिहाय पुराव्यांची यादी करून ग्रामपंचायत/तलाठी कार्यालयात ही यादी लावली जाणार आहे. गावात दवंडीच्या माध्यमातून यादी सांगितली जाणार आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.