करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील नऊ गावांमध्ये कोतवाल नेमणुकीची सध्या प्रक्रिया सुरु आहे. या जागांसाठी तब्बल ८७ अर्ज आले आहेत. त्यामुळे मोठी स्पर्धा होणार आहे. दोन गावात एकही अर्ज न आल्याने तेथे जागा रिक्त राहणार आहेत. आलेल्या अर्जामध्ये अनेकजण पदवी व पदवीत्तर शिक्षण झालेले उमेदवार आहेत. परीक्षेतून ही भरती होणार आहे.
चिखलठाण येथे भ. ज. ड, केत्तूर येथे अराखीव महिला, विहाळ अराखीव, कात्रज इतर मागास वर्ग, पांडे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, टाकळी अराखीव, मलवडी अराखीव, पारेवाडी इतर मागास वर्ग महिला व कंदर अनुसूचित जमाती असे आरक्षण पडलेले आहे. यामध्ये चिखलठाण व पारेवाडी येथे एकही अर्ज आलेला नाही. चिखलठाण येथे भजड आरक्षणाची एकही व्यक्ती नसल्याने अर्ज आलेला नाही, असे सांगितले जात आहे. तर पारेवाडी येथे ओबीसीचे आरक्षण असूनही येथे एकही अर्ज आला. केत्तूर येथे २०, विहाळ १५, कात्रज ४, पांडे १२, टाकळी २०, मलवडी १९, कंदर ४ असे आरक्षण असणार आहे. प्रांताधिकारी समाधान घुटूकडे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड व मंडळ अधिकारी अनिल ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया सुरु आहे.