करमाळा (सोलापूर) : आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज (शनिवारी) जेऊर येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.
आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर येथे रक्तदान शिबीर झाले. यामध्ये १५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आरोग्य शिबीरही झाले. वाढदिवसानिमित्त आठवडाभर मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले. चिखलठाणमध्ये नेत्र तपासणी व मोफत शुगर तपासणी किट वाटप, गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात आरोग्य शिबीर, आवाटी येथे रक्तदान शिबीर, कुर्डुवाडी येथे भव्य रोजगार मेळावा, भाळवणी येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना वह्या वाटप, सरफडोह येथे नियोजित नेत्र तपासणी शिबीर, भारत हायस्कूल जेऊर येथे विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण कामास प्रेरणा म्हणून रोपांचे वाटप आदि उपक्रम राबवले गेले.