Story of Jagdish Agarwal and Deepak Chavan from KarmalaStory of Jagdish Agarwal and Deepak Chavan from Karmala

काही घटना, प्रसंग मनाला खूप वेदना देऊन जातात पण त्या घटना प्रसंग मनावर ठसायलाही मन तितकंच संवेदनशील असावं लागतं हेही खरं…. काल रविवार होता… मी माझ्या मुलीला घेऊन करमाळ्याला चाललो होतो…. करमाळ्याच्याजवळ हायवेला एक 50- 55 वर्षाची व्यक्ती कमरेभोवती नुसता टॉवेल गुंडाळून हळूहळू जाताना आम्हाला दिसली… अंगात मळका टी-शर्ट, दाढी वाढलेली आणि कसलेही भान नसलेली ती व्यक्ती बघितली की कोणाच्याही काळजात चर्र व्हावं…

कारण पिंढरीपासून घोट्यापर्यंत त्याचे दोन्ही पाय सडलेले होते. काळसर लाल कातडी इथे तिथे लोंबत होती. पाय सुजून भप्प झालेले… आतलं मांससुद्धा सडून गेलेलं… तरीही तो तिथल्या तिथे झपझप चालत होता. माणसासारखी माणसं कुठल्या जन्मीचं पाप याच जन्मात फेडतात कोणास ठाऊक? क्षणभर विचार आला की याला त्याच्या जिवाभावाची माणसं नसतील का ??? कोणी रक्ताचं, आपलं म्हणणार नसेल का ???? साला मी तरी किती असाहाय्य आहे.

गाडी चालवताना स्व. बाबा आमटे आणि त्यांचं आनंदवन सतत नजरेसमोर येत होतं आणि बाबांची आभाळाएवढी उंची पुन्हा पुन्हा अधोरेखित होत होती. आज पुन्हा त्या तिथेच मला ती व्यक्ती रस्त्याच्या कडेला निपचित पडलेली दिसली. आज माझा मुलगा माझ्यासोबत होता…. म्हणाला पप्पा काहीतरी करा….

मग मी करमाळ्यातील केशव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि हॉटेल व्यवसायिक जगदीश अग्रवाल आणि सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य दीपक चव्हाण यांना कॉल केला आणि त्या व्यक्तीची पूर्ण कल्पना त्यांना दिली. मी त्यांना म्हणालो की ती व्यक्ती तशी रस्त्यावर पडून आहे ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमची यंत्रणा वापरा आणि त्या व्यक्तीला दवाखान्यात हलवा.. खूप वर्षांपूर्वी करमाळा हे असं गाव होतं की तिथं कोणीही यावं आणि मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या व्यक्ती खुशाल सोडून द्याव्यात…

दर महिन्याला असे स्त्री पुरुष गावात हिंडताना दिसायचे.. साधारणत 80- 90 च्या दशकातील कालखंड होता. त्यावेळेस मी नववीला होतो . तेव्हा कुणीतरी एकानं ही अशीच एक मानसिक स्वास्थ्य हरवलेली व्यक्ती उचलून होळीत टाकली होती …. तो 60- 70 टक्के भाजला होता .. होरपळलेल्या अंगाने सतत आक्रोश करीत ती व्यक्ती गावभर भटकत होती . लोक फक्त हळहळत होते.. तो ओरडत तळमळत जवळून गेला की त्याच्या जळलेल्या देहाचा जळकट वास यायचा. मन उदासीने भरून जायचे.

आज इथे ती तशी पडून राहिलेली व्यक्ती पाहिली की माझ्या त्या आठवणी पुन्हा ठसठसू लागल्या… केशव प्रतिष्ठानची ही तरुण मंडळी खरंच माणूसपणाच्या खुणा जपणारी आहेत . आताच्या काळात माणसांना पदं पाहिजेत, मोठेपणा पाहिजे, पैसे देऊन का होईना पण एखादा पुरस्कार पाहिजे…. अशा या काळात जग्गू आणि दीपक सारखी युवा मंडळी स्वतः पुढे होऊन कोणतेही काम करतात आणि तेही कोणत्या पुरस्कारासाठी नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे.

आजही तेच घडले… ही तरुण मंडळी भाजपाशी संबंधित आहेत म्हणून काय झालं??? माणूसपणाच्या कळा ज्यांच्या अंतकरणाला भिडल्या ती मंडळी कोणत्याही पार्टीची, पंथाची असो ती कायम मोठीच असतात…

त्या व्यक्तीला मदत करताना त्यांनी त्याची जात नाही विचारात घेतली किंवा त्याला त्याचे नाव सुद्धा विचारले नाही…
ते दोघे ॲम्बुलन्स घेऊन आले आणि त्या व्यक्तीला उचलून त्यांनी त्याला त्यात ठेवले…तिथून करमाळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले आणि तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करून त्या व्यक्तीला सोलापूरला हलवण्यात आले…

एवढे झाल्यावर जग्गू ने मला फोन केला आणि सांगितले की सर त्याला सोलापूरला हलवले आहे… त्याचे दोन्ही पाय कापावे लागतील… जळगावचा आहे तो… साला कुठे जळगाव आणि कुठे करमाळा…. आपल्याच माणसांचं ओझं झालं की त्याला दूर कुठेतरी अज्ञात ठिकाणी सोडून द्यायचं आणि त्याच्या त्या ओझ्यातून मुक्त व्हायचं ही आताच्या भावना शून्य जगाची रीत बनलीय…कोण कुणाचा नाही… आताच्या काळात माणूस माणसाचा नाही.. तो कुणाला ओळखत नाही.. ओळखतो फक्त नोटेच्या कडकडीत स्पर्शाला…..

तरीही मी म्हणेन की जगू आणि दीपक सारख्या बोटावर मोजता येणाऱ्या व्यक्तींच्या भरवशावर आपण माणसा मधल्या चांगुलपणाचे कौतुक करायला काय हरकत आहे नाही का????? आणि जाता जाता मी एवढंच म्हणेन की माणसांमधील माणुसकीचे हे झरे कधीही आटू नयेत इतकंचं…

(दीपक पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ सर यांचा जुना शेजारी आहे..)

भीष्मा चांदणे
9881174988
करमाळा…

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *