करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या सरकारने मागण्या मान्य करून ‘जीआर’ काढल्यानंतर करमाळ्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समाज बांधवानी फटाके फोडून ढोल- ताशाच्या काढकढात, गुलालाची उधळण करत पेढे वाटप करून नाचत आनंदोत्सव साजरा केला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण केले. आज (मंगळवारी) पाचव्यादिवशी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदय सामंत, प्रतापराव सरनाईक, माणिकराव कोकाटे आदींनी हे जीआर जरांगे यांच्या हाती दिले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर मराठा समाज बांधवानी मोठा जल्लोष केला.

जरांगे यांनी हैद्राबाद गॅझेटिअरची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्याला सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे मराठा समाजातील व्यक्तींना, गावातील, कुळातील, नातेवाइकांतील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.
सातारा, औंध गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीरबाबी तपासून एक महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे सप्टेंबरपर्यंत मागे घेतले जाणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याचाही निर्णय झाला आहे. मिळालेल्या ५८ लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतला लावले जाणार आहे. तात्काळ व्हॅलिडिटी देण्याबाबतही निर्णय झाला आहे. या निर्णयाचे स्वागत करमाळ्यात करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा खूप मोठा त्याग आहे. त्यांनी आरक्षणासाठी मोठा लढा तयार केला. त्यामुळे संपूर्ण समाजबांधव त्यांच्या मागे उभा राहिला. इतर बहुजन समाजाचेदेखील बांधव या लढ्यात आमच्याबरोबर होते. जरांगे यांचे आम्ही अभिनंदन करत असून आम्ही या लढ्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. सरकारच्या या जीआरमुळे सर्वांना फायदा होणार आहे.
– कल्याण गुणवरे, करमाळा
मनोज जरांगे यांच्या आठपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. या निर्णयाचा नक्कीच समाजबांधवांना फायदा होणार आहे. जरांगे यांच्या लढ्यामुळे अनेक समाजबांधवांना कुणबी जातप्रमाणपत्र मिळाली आहेत. हा मराठ्यांचाच विजय आहे. निस्वार्थीपणे जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांठी हा लढा उभारला होता. त्याला हे यश आले आहे.
– प्राचार्य मिलींद फंड, करमाळा
गुलालाची उधळण
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारने आज जीआर काढले त्यानंतर करमाळ्यात गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समाजबांधवांनी आनंदोत्सव साजरा केला.
सकाळी रक्ताभिषेक सायंकाळी आंनदोत्सव
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी करमाळ्यात आज सकाळी साडेअकरा वाजता बबन चांदगुडे व इंदलकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महादेवाची पिंड मांडून डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तभिषेक केला. तेव्हा वेळीच या आंदोलनाकडे लक्ष दिले नाही तर अनेक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तेव्हा अनेक समाजबांधव उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यामुळे जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. त्यामुळे पुन्हा त्याच ठिकाणी मराठा समाजबांधवांनी आंनदोत्सव साजरा केला.
मुंबईतून परतताना रेल्वेतही आंनदोत्सव
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी करमाळ्यातून अनेक मराठा समाज बांधव मुंबईला गेले होते. सरकारने पाचव्या दिवशी मागण्या मान्य केल्यानंतर करमाळ्यातील समाजबांधव रेल्वेने करमाळ्याकडे परतत आहेत. त्यांनी रेल्वेतही गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
घोषणांनी परिसर दणाणला
जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मराठा समाजबांधवानी ‘पाटील पाटील’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘मनोज जरांगे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.