करमाळा (अशोक मुरूमकर) : मुरूम वाहतूक कारवाईप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. कारवाई थांबवण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच त्यांना फोन आला. त्यावर मात्र त्यांनी न घाबरता स्वतःच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महिला अधिकाऱ्यांला धमकवल्याचा आरोप केला असून त्यांची माफी मागा, असे म्हटले आहे.
अंजना कृष्णा यांनी करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. त्या आयपीएस अधिकारी असून त्यांचे हे पहिलीच पोस्टिंग आहे. गणेशोत्सवात त्यांनी डीजे मुक्त करमाळा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. त्यातच त्या मुरूम कारवाईप्रकरणात चर्चेत आल्या आहेत. याबाबत त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कारवाई थांबवण्याबाबत व्हिडीओ कॉल करा, असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘तुम्ही माझा चेहरा चेहरा ओळखता का? मी तुमच्यावर कारवाई करेल, तुमची एवढी डेअरींग?’ असे म्हटले. मात्र अंजना कृष्णा या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्या आणि स्वतःचा मोबाईल नंबर सांगितला. हा व्हिडीओ व्हायरला झाला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या आहेत, ‘करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी? तुझे डेरिंग कसे झाले असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी? ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे’ असे त्या या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
अजित पवारांचा #IPS अधिकाऱ्याला थेट फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे “कारवाई थांबवा”चा आदेश. हा सत्तेचा दुरूपयोग आहे.DySP अंजली कृष्णा यांनी कायदा पाळला, पण उपमुख्यमंत्र्यांनी धमकावलं? मुरुमासाठी इतका हस्तक्षेप का? महाराष्ट्रात खरंच काय चाललंय? अशाच कामांसाठी राज्यातील नेत्यांना आपल्या भागात मर्जीतील अधिकारी हवे असतात का?
सुराज्य संघर्ष समिती व आम आदमी पार्टीचे (महाराष्ट्र) उपाध्यक्ष विजय कुंभार यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, ‘अजित पवारांचा IPS अधिकाऱ्याला थेट फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे ‘कारवाई थांबवा’चा आदेश. हा सत्तेचा दुरूपयोग आहे. DySP अंजली कृष्णा यांनी कायदा पाळला, पण उपमुख्यमंत्र्यांनी धमकावलं? मुरुमासाठी इतका हस्तक्षेप का? महाराष्ट्रात खरंच काय चाललंय? अशाच कामांसाठी राज्यातील नेत्यांना आपल्या भागात मर्जीतील अधिकारी हवे असतात का?’, असे म्हणत प्रश्न केला आहे.