सोलापूर : यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी म्हणजे 29 जूनला आहेत. दोन्ही सणांच्या पार्श्वभूमिवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मुस्लिम बंधुंनी कुर्बानीसाठी अधिकृत कत्तलखान्याचा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी आज येथे केले.
बकरी ईद समन्वय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस महानगरपालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. धनाजी गिड्डे, मोटार वाहन निरीक्षक शिवाजी सोनटक्के तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार म्हणाल्या, उच्च न्यायालयाने अधिकृत कत्तलखान्याव्यतिरिक्त पशुंची कत्तल करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वांनी पालन करावे. महापालिका, नगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कुर्बानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील नागरिकांनी 29 जून 2023 रोजी घरगुती पद्धतीने ईद साजरी करून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस, परिवहन, पशुसंवर्धन विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर यांनी स्वागत केले. तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. धनाजी गिड्डे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या बकरी ईद बाबतच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली. अधिकृत कत्तलखाना म्हणून अपेडा मान्यताप्राप्त खाजगी कत्तलखाना मुळेगाव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील मे. सोनअंकुर एक्स. प्रा. लि. हा घोषित केलेला आहे.