करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘बारामती ॲग्रो ऊस गाळपात कधीही राजकारण करत नाही. येथे गट-तट पाहिले जात नसून सर्वांचा ऊस हा प्रोग्रामप्रमाणेच तोडला जातो. शेतकरी, वाहतूकदार यांचे पेमेंट वेळेवर जाते. त्यामुळे सर्वांनी निश्चित राहून कारखान्याला ऊस द्या,’ असे आवाहन बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले आहे.
वाहतूकदार व शेतकऱ्यांच्या सोईसाठी करमाळा येथे बारामती ॲग्रोचे गट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. यांच्या उदघाटनप्रसंगी उपाध्यक्ष गुळवे यांच्यासह राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भारत अवताडे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, बोरगावचे विनय ननवरे, अशपाक जमादार, सचिन नलवडे, ऊस वाहतूकदार व अनेक शेतकरी आदी उपस्थित होते.
उपाध्यक्ष गुळवे म्हणाले, ‘बारामती ऍग्रो या कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. सीना नदी, मांगी तलाव, सीना कोळगाव धरण परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. येथील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यासाठी कारखान्याने मोठी यंत्रणा उभारली आहे. कोणत्याही शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून कारखान्याने येथे गट कार्यालय सुरु केले आहे.’
वारे व आवताडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ‘तालुक्यात दोन सहकारी साखर कारखाने असताना शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होत आहे. हे कारखाने बंद असताना बारामती ऍग्रोमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार तयार झाला आहे. या कारखान्याने वेळेवर बिल दिले आहे. त्यामुळे ऊस देण्यासाठी शेतकरी तयार आहेत. मात्र कारखान्याने सक्षम यंत्रणा द्यावी’, असे बागल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.