करमाळा (सोलापूर) : नवभारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीने राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूरच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. त्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातून 14, 17,19 वर्षांखालील मुली व मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा पार्क स्टेडियम महापालिका हॉल सोलापूर येथे 18 सप्टेंबरला झाल्या. बुद्धिबळ स्पर्धेत नवभारत इंग्लिश मेडियम स्कूलमधील दहावीतील सिद्धी देशमुख व दूर्वा नवले या खेळाडूंनी अतुलनीय कौशल्य सामंजस्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करून सर्वत्र प्रशंसा मिळवली.
स्पर्धेदरम्यान नवभारत इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच जोरदार खेळाची ओळख करून दिली. त्यांनी सलग सामने जिंकत जिल्ह्यात शक्तिशाली खेळाडूंना आपल्या श्रेष्ठतेची छाप पाडली. त्यांच्या विजयी यात्रेत सोलापुर जिल्यातील पंढरपूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट, माळशिरस अशा विविध शाळेमधील खेळाडूंना पराभूत करण्यात आले. या यशामागे खेळाडूंच्या कठोर परिश्रमाबरोबरच क्रीडा शिक्षक देशमुख, नागनाथ बोळगे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, संचालिका सुनीता देवी, मुख्याध्यापिका अश्विनी देशमाने, सहशिक्षिका शेटे, काळे, देशमुख, बागल, बोकन, श्री गुळवे यांच्यासह शिक्षककर्मचारी तसेच पालकांनी या यशावर खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.