करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील विविध मागण्यासाठी प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील साखर कारखान्यानी आठ दिवसात थकीत बिले न दिल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यामध्ये पाऊस न पडल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे करमाळा तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात यावा. करमाळा तालुक्यात तहसीलदार रिक्त आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखले वेळेत मिळत नाहीत. मकाई सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर विहाळ, कमलाई शुगर या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची बिले त्वरित द्यावीत.
मकाई व आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगारी तसेच त्यांच्या नावावरती किंवा त्यांच्या गॅरंटीने काढलेली बँकेची अथवा इतर वित्तीय संस्थांची कर्जे भरून या कारखान्यांनी कर्मचाऱ्यांची कर्ज निरंक करून त्यांना या कर्जाच्या विळख्यातून दूर करावे. वाहन मालकांची थकलेली ऊस वाहतुकीची बिले तातडीने द्यावीत तसेच या दोन्ही कारखान्यांच्या वाहन मालकांच्या नावावरती उचललेली कर्जे त्वरित भरून निरंकचे दाखले देण्यात यावेत. सध्या विविध सणांचा कालावधी असल्याने व विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु असल्याने विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी व कामगारांना पैशांची कमतरता भासत आहे म्हणून वरील सर्व थकलेली बिले कारखान्यांनी आठ दिवसाच्या आत पूर्ण करावी व इतरही मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा इशारा त्यांनी दिला आहे.
आदिनाथचे माजी संचालक कामगार नेते दशरथ कांबळे, रासपचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, धनगर समाज संघटनेचे बाळासाहेब टकले, संतोष वाळुंजकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, काँग्रेस ओबीसी तालुकाध्यक्ष गफुर शेख, माजी सरपंच भगवान डोंबाळे, मकाईचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, प्रभाकर शिंदे, शिवसेनेचे संजय शिंदे, नानासाहेब देवकर, बाबाजान खान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सचिन काळे, भाजपाचे सुहास ओहोळ, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, विजयकुमार नागवडे, अशोक जाधव, युवराज जाधव यांच्या निवेदनावर सह्या आहेत.